मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी महापौरांचा दादरमधील बंगला खाली करण्याचे काम सुरु झाले आहे. २३ जानेवारीला स्मारकाचे भूमीपूजन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापौरांचे निवासस्थान आता राणीच्या बागेत असणार आहे. मुंबई महापौरांच्या शिवाजी पार्कमधील बंगल्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक होणार असल्याने येथील साहित्य राणीच्या बागेतील बंगल्यात नेले जात आहे. राणीच्या बागेतील उद्यान अधिक्षकांच्या बंगल्यात आता महापौरांचे वास्तव्य असणार आहे. २३ जानेवारीला स्मारकाचे भूमिपूजन होण्याची शक्यता असल्याने तत्पूर्वी महापौर बंगला युध्दपातळीवर रिकामा करण्याचे काम सुरू झाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


विधानसभेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दादर येथील स्मारक बिल एकमताने मंजूर करण्यात आले होते. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबतचे सुधारित विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. राज्यमंत्री रणजित पाटील यांनी हे विधेयक सादर केले. या विधेयकाला भाजपसह मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादीनेही पाठिंबा दिला. त्यानंतर कोणतीच हालचाल सुरु झालेली नव्हती. 


स्मारकासाठी मुंबईच्या महापौर बंगल्याची जागा देण्याचा निर्णय नगरविकास विभागाने यापूर्वीच घेतला होता. त्याबाबतची अधिसूचनाही काढली होती. महापौर बंगल्याची जागा पालिकेच्या मालकीची असल्यामुळे ती स्मारक समितीला हस्तांतरित करण्यासाठी सुधार समितीची आणि सभागृहाचीही मंजुरी मिळाली होती. आज अचानक महापौर बंगल्यातील सामान हलविण्यात येत आहे. त्यामुळे स्मारकासाठी हालचाली सुरु झाल्याची चर्चा आहे. मुंबई महापौर बंगल्याच्या ११,५५१.०१ चौरस मीटर जागेत बाळासाहेबांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. बाळासाहेबांचे स्मारक व्हावे ही शिवसैनिकांची इच्छा आहे. ही इच्छा लवकरच पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.