Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांनी पक्षात बंडखोरी केल्यानंतर पक्षाच्या अनेक नेत्यांनी त्यांना समर्थन दिलं. शिवसेनेतून तब्बल 39 आमदार फुटून एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले. परिणामी उद्धव ठाकरे यांचं सरकार अल्पमतात आलं आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. बंडखोर शिवसेना आमदार आणि भाजपच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खर तर महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार हे मानलं जात होतं, पण त्यांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावं लागलं. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ताशेरे ओढले आहेत. फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारवं लागलं हाच खरा भूकंप आहे, पण ते असे 'अर्धवट' येतील असं कुणालाच वाटले नव्हते! आता राज्यात काय होणार? अशा शब्दात संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यावर ताशेरे ओढले आहेत.


उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याने महाराष्ट्रातील एक पर्व संपले. जेमतेम अडीच वर्षांचाच हा कालखंड, पण बुधवारी रात्री मुख्यमंत्रीपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा देऊन ते मुक्त झाले. पाच वर्षांसाठी स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्षांतच कोसळले, ते काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमुळे नाही. 


उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देताना सांगितलं 'माझ्याच लोकांनी दगा दिला' चाळीस आमदारांपैकी काहींनी आधी शिवसेनेचा राज्यसभेचा उमेदवार पाडला आणि याच गटाने भारतीय जनता पक्षाचा पाचवा उमेदवार विधान परिषदेत विजयी केला. दगाबाजीची ही बीजे रोवली जात असताना मुख्यमंत्री याच लोकांवर कुटुंबाचे घटक म्हणून विश्वास ठेवून होते. एका महानाट्यात छत्रपती शिवरायांच्या तोंडी एक ज्वलंत वाक्य आहे. छत्रपती सांगतात, 'शत्रूची फौज कधीच मोजू नका. आपल्यातील फितूर किती ते मोजा!' अशी आठवण संजय राऊत यांनी करुन दिली.


एकनाथ शिंदे यांच्याबरोबर किती आमदार आहेत ते सोडा, पण हे सर्व आमदार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे उमेदवार म्हणून विजयी झाले आणि त्यांनीच उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केलं. पक्षांतरबंदीविरोधी कायद्याने त्यांची आमदारकी जाऊ शकते, पण महाराष्ट्राचे राज्यपाल व सर्वोच्च न्यायालयाने पक्षांतर करणाऱ्यांना बळ दिलं. 


जर कोणाला पक्ष बदलायचा असेल तर त्याने जनतेच्या नजरेसमोर बदलला पाहिजे. त्याच्यात जनतेला तोंड देण्याचे सामर्थ्य असले पाहिजे. आमच्या लोकशाहीला तेव्हाच बळ लाभेल की, जेव्हा पक्ष बदलणारा राजीनामा देऊन पुन्हा जनतेत जाईल. तसं न करणाऱ्यांना कायद्याने बाद केले पाहिजे आणि पक्षांतरबंदी कायद्याची बूज राखली पाहिजे. मात्र महाराष्ट्रात वेगळे घडवले गेले. पक्ष बदलणाऱ्या अपात्र ठरण्याची शक्यता असलेल्या आमदारांनी महाराष्ट्राचे राजकीय भवितव्य ठरवले व राज्यपाल महोदयांनी या घटनाबाह्य कृतीचे 'पेढे' खाल्ले, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.