कोरोनानं जग संकटात, कोरोनाचे रुग्ण २ लाखांवर, ८ हजारांवर मृत्युमुखी
आर्थिक संकटावर मात करण्याचं मोठं आव्हान
मुंबई : कोरोनाचा फैलाव आता जगभरात झाला असून जगभरात कोरोनाचे २ लाखांवर रुग्ण झाले आहेत. कोरोनामुळे जगभरात ८ हजारांवर रुग्ण मृत्युमुखी पडले असून ८० हजारांवर रुग्ण कोरोनामुक्तही झाले आहेत ही जमेची बाजू आहे.
कोरोनाचं संकट गडद होत असताना अमेरिका आणि ब्रिटननं कोरोनामुळे आलेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मोठ्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिका आणि युरोपमध्येही कोरोनाच्या संकटामुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे.
जगभरात मृतांचा आकडा ८ हजारावर गेला असताना सर्वाधिक ३२०० हून अधिक बळी चीनमध्ये गेले आहेत. त्यानंतर इराणमध्ये २५०० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. इराणमध्ये मृतांचा आकडा हजाराच्या जवळ पोहचला आहे. तर स्पेनमध्ये ५५०हून अधिक कोरोना रुग्णांचा मृत्यु झाला आहे. फ्रान्समध्ये मृतांची संख्या दीडशेच्या जवळपास पोहचली आहे. अमेरिकेत १०० हून अधिक लोक मृत्युमुखी पडलेत, तर ब्रिटनमध्ये ७० हून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दक्षिण कोरियात हा आकडा ८४ तर जपानमध्ये २९ इतका आहे.
अनेक देशांत लॉकडाऊन
इटलीमध्ये आणीबाणीची स्थिती आहे. तिथे मास्कची किंमतही १२०० रुपयांवर पोहचली आहे. इटलीमध्ये आधीच लॉकडाऊन जाहीर करण्यात आलंय. फ्रान्समध्ये कोरोनावर उपाययोजना करण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आलं आहे. फ्रान्समधील ६ कोटी ७० लाख लोकांना लॉकडाऊन करण्यात आलंय. तिथे कोरोनाशी लढण्यासाठी वैद्यकीय साहित्य, मास्क यांचा तुटवडा निर्माण झालाय. हॉस्पिटलमधील कर्मचारीही आजारी पडू लागलेत. रुग्णांचा आकडा साडेसात हजारांवर पोहचलाय. त्यामुळे रुग्णांना नेण्यासाठी लष्कराच्या विमानांचा वापर करण्यात येतोय. अशा लष्करी व्यवस्थेचा वापर अफगाणिस्तान आणि कोसोवो मध्येच याआधी केवळ ५ वेळा करण्यात आला होता. फ्रान्समध्ये लष्कराची पाच रुग्णालयंदेखील तयार ठेवण्यात आली आहेत.
इराकमध्येही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे इराकचे रस्ते मोकळे झाले आहेत. इराकमध्ये १५४ रुग्ण आढळले असून ११ मृत्यु झालेत. त्यामुळे उपाययोजना करत बगदादमध्ये २४ मार्चपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलीय.
स्पेनमध्ये अंशतः लॉकडाऊन करण्यात आलंय. केवळ कामावर जाण्यासाठी, अन्न खरेदीसाठी, औषधाची दुकानं आणि रुग्णालयात जाण्यासाठीच लोकांना घराबाहेर पडण्याची परवानगी देण्यात आलीय. घरी आलेल्या डिलिव्हरी बॉयला लोक दरवाजाला स्पर्शही करू देत नाहीत एवढी भीती स्पेनमध्ये पसरली आहे. स्पेनच्या संसदेत पंतप्रधान सांचेझ यांनी भाषण केलं तेव्हा ३५० सदस्यांपैकी केवळ ५ मंत्री आणि २८ सदस्य उपस्थित होते. त्यामुळे आणीबाणीच्या स्थितीत लोकप्रतिनिधींनाही कोरोनाची किती भीती आहे याचा अंदाज यावरून येऊ शकतो.
आर्थिक संकटावर मात करण्याचं आव्हान
तिकडे अमेरिकेतही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. अमेरिकेच्या सर्व राज्यांत कोरोना पसरला आहे. शंभरावर बळी गेल्यानंतर लोक घरातून बाहेर पडायला तयार नाहीत. शाळा, कॉलेज, मॉल ओस पडले आहेत. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कोरोनाचा मोठा परिणाम झाल्यानं राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मोठं आर्थिक पॅकेज जाहीर केलंय. ८५० बिलियन डॉलर्स एवढी मदत प्रस्तावित करताना मंदीचा फटका बसलेल्या अमेरिकन नागरिकांना दोन आठवड्यात थेट मदत करण्याची योजना ट्रम्प प्रशासनानं आखली आहे.
ब्रिटनमध्येही कोरोनामुळे आलेल्या आर्थिक आणीबाणीवर मात करण्यासाठी उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान बोरीस जॉन्सन आणि अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी ३५० बिलियन पौंड इतकं मोठं पॅकेज उदयोग आणि अन्य क्षेत्रांसाठी जाहीर केलं आहे.
कोरोनामुळे जगातील मोठे आणि महत्वाचे देशही लॉकडाऊन होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे येणाऱ्या मोठ्या आर्थिक संकटाची चाहुल अमेरिका आणि ब्रिटनला लागताच त्यांनी तातडीची आर्थिक उपाययोजना सुरु केली आहे.