वर्ल्ड फोटोग्राफी डे : चौकटीपलीकडची कथा सांगणाऱ्यांचा दिवस
१९ ऑगस्ट हा दिवस जगभरातत फोटोग्राफी डे म्हणून साजरा केला जातोय.
सुस्मिता भदाणे, झी मीडिया, मुंबई : स्माईल किंवा चीझ म्हणत प्रत्येकाची छबी टिपली जाते ती कॅमेऱ्यातून... मात्र आपली हिच छबी कॅमेऱ्यात कैद करतो तो छायाचित्रकार.. भूतकाळाच्या आठवणी जगासमोर आणतो तोच हा फोटोग्राफर. या कलेला जिवंत ठेवणाऱ्यांसाठी खास दिवस म्हणजे वर्ल्ड फोटोग्राफी डे. फोटोच्या एका चौकटी पलीकडची कथा सांगणाऱ्या कलाकरांच्या कलेचा सन्मान करण्याचा हा दिवस. १९ ऑगस्ट हा दिवस जगभरातत फोटोग्राफी डे म्हणून साजरा केला जातोय.
फोटोग्राफीमध्ये प्रचंड बदल
काळानुरूप फोटोग्राफीमध्ये प्रचंड बदल झाले. कृष्णधवल ते सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे समृद्ध झालेल्या फोटोग्राफीने प्रत्येकाला भुरळ पाडली. आधीच्या काळात मोजक्या क्षणी हा कॅमेऱ्यात टिपलं जायचं. मात्र सध्या तर मोबाईल आणि स्मार्ट फोनच्या रुपात प्रत्येकाच्या हातातच जणू कॅमेरा आलाय. ज्यात सेल्फीपासून अनेक प्रकारचे फोटो काढायला मंडळी सज्ज असतात. मात्र फोटोतून भावना व्यक्त करण्याची किमया प्रत्येकाला जमतेच असं नाही. कारण एखाद्या फोटोला जिवंत करण्याची करामत फक्त उत्तम छायाचित्रकारच करु शकतो.
तोच खरा छायाचित्रकार
एखादी गोष्ट सांगण्यासाठी जिथे हजार शब्द वापरावे लागतात तिथेच केवळ एक प्रभावी फोटो क्षणात सारे भाव व्यक्त करतो . अश्या प्रकारची छायाचित्रे आपण दररोज वर्तमानपत्रात पाहतो. यामागे नजर असते ती फोटोजर्नालिस्टची. आपल्या अवतीभवती अनेक मंडळी एका क्लिकने प्रत्येक क्षण टिपण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र खरा छायाचित्रकार क्षणात घडत नाही. जो अचूक क्षणांना अचूक वेळी आपल्या कॅमेऱ्यात कैद करतो तोच खरा छायाचित्रकार.