मुंबई : शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडून वरळीकरांना प्रचंड अपेक्षा आहेत. वरळीकरांनी प्रचंड बहुमताने त्यांना निवडून दिले आहे. ठाकरे घराण्यातील निवडणूक लढवणारी ही पहीली व्यक्ती होती. त्यामुळे त्यांच्याबद्दल भावनिक राजकारणही झाले. या अपेक्षांना खरे उतरण्याची जबाबदारी आदित्य ठाकरे यांच्यावर आहे. दरम्यान आमदार आदित्य ठाकरे यांनी वरळीतील विविध प्रश्नांसाठी महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांची महापालिका कार्यालयात जाऊन भेट घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वरळीतील प्रश्नांसदर्भात, समस्यांविषयी आयुक्तांशी चर्चा केल्याचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले. कचरामुक्त, खड्डेमुक्त, रोगमुक्त वरळी हे वरळीचा आमदार म्हणून लक्ष्य राहिल असे त्यांनी सांगितले. मेट्रो तसेच पुनर्विकासामुळे वरळीमध्ये रस्त्यांच्या कामाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ही रस्त्यांची कामे लवकरच मार्गी लागतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्य सरकार आणि मुंबई महापालिका मिळून रस्त्यांची कामे जलदगतीनं पूर्ण करणार असल्याचेही ते म्हणाले. 



मुंबईत बेस्ट सेवा सध्या परवडणारी असली तरी बेस्ट प्रशासन तोट्यातून अद्याप सावरलेले नाही. त्यामुळे वरळीचे प्रतिनिधीत्व करताना शिवसेना नेता म्हणून त्यांना मुंबईतील समस्यांकडे त्यांना लक्ष घालावे लागणार आहे. बेस्टची सेवा आणखी सुधारणार तसेच बेस्टची परिस्थिती देखील सुधारेल असा विश्वास आमदार ठाकरे यांनी व्यक्त केला. बेस्टच्या ताफ्यात नव्या बसेस दाखल करणार असल्याचे ते म्हणाले. माहिम ते सिद्धीविनायक कल्चरल रुट तयार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.