दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना-भाजपाचे संबंध तुटल्यानंतर हे दोन्ही पक्ष एकमेकांवर फसवणुकीचा आरोप करत होते. मात्र भाजपाने शिवसेनेला फसवल्याची कबुलीच भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगुंटीवार यांनी आज विधानसभेत दिली, आम्ही शिवसेनेला फसवले, पण आमच्या चुकीचा तुम्ही एवढा मोठा फायदा फायदा उचलला. कधी ना कधी आम्ही ही चूक सुधारू, असं धक्कादायक विधान सुधीर मुनगुंटीवार यांनी विधानसभेत केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणुकीत युती करताना मातोश्रीवर उद्धव ठाकरे, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक पार पडली होती. 


या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या युतीबबात आणि मुख्यमंत्रीपदाबाबतही चर्चा झाली होती. तीन नेत्यांमध्ये झालेल्या या चर्चेनंतर मुख्यमंत्रीपदावरून भाजप, शिवसेना दावे प्रतिदावे केले गेले. 


मुख्यमंत्रीपद अडीच वर्ष देण्याचा शब्द भाजप नेत्यांनी  दिल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी करत भाजप खोटं बोलत असल्याचं विधान वारंवार केलं होतं. तर मुख्यमंत्रीपद अडीच वर्ष देण्याचा शब्द दिला नव्हता असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी करत शिवसेनेला खोटं पाडलं होतं. 


नक्की कोण खरं आणि कोण खोटं हा प्रश्न त्यामुळे उपस्थित झाला होता. मात्र आम्ही शिवसेनेला फसवल्याची कबुलीच सुधीर मुनगुंटीवार यांनी विधानसभेत दिली. 


त्यापुढे जाऊन मुनगंटीवार म्हणाले, मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही एखादा ज्योतिरादित्या सिधीया तयार होईल, असा इशारा त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दिला आहे. 


राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे आता १०० दिवस पूर्ण झाले आहेत. या सरकारचे १०० अपराध पूर्ण झाल्यानंतर हे सरकार कोसळेल, असं विधानही मुनगुंटीवार यांनी केलं आहे.