मुंबई : कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज प्रचारात उतरले. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव यांच्या प्रचारार्थ त्यांनी ऑनलाईन सभा घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सभेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपवर सडेतोड टीका केली. अशी सभा करण्याची माझी सवय नाही. समोरा समोर लढण्याची आमची सवय आहे. पृथ्वीराज पाटील यांचे कौतुक आहे. लढायचे कसं हे कोल्हापूरच्या मातीला चांगलं ठाऊक आहे. पण, काही जणांमध्ये स्वतःची अशी धमक नाही. त्यामुळे ही धाड, ती धाड असे पाठचे वार करतात, अशी टीका त्यांनी केली.


माझे आजोबा आणि शाहू महाराज यांची वेगळी नाळ आहे. नानाच्या प्रचाराला फडणवीस येवून गेले. यातच सगळं आलं. वरकरणी राजकारण करणे हे माझं काम नाही. तर, कोणावर संकट आले तर धावुन येणं हे माझं काम आहे.


यांच्याकडे स्वतःच्या कर्तृत्वाचे कोणते मुद्दे नाहीत. मात्र, धार्मिक तेढ निर्माण करायची सवय आहे. अगदी सरकार सत्तेत आलं आणि त्यावेळेपासून आपत्तीची मालिका सुरु झाली. कोरोना आला, नैसर्गिक आपत्ती आली. महापूर आला. एकामागून एक संकट येत राहिली. पण, आम्ही कामात कमी पडलो नाही. 


आम्ही प्रशासकीय कामात उत्तम ठरलो. संकटकाळात मदत देण्यात उत्तम ठरलो. आम्ही कामात कमी पडत नाही. पण.. एक मान्य करतो की आम्ही खोटं बोलण्यात आम्ही कमी पडतो. मात्र, काही झालं तरी आम्ही खोटं बोलणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.