मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackarey ) यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackarey ) यांचा एक व्हिडिओ आज ट्विट केला आहे. धर्म विकासाचा आड येता कामा नये, मशिदीवरचे लाऊडस्पिकर खाली येतील, रस्त्यावरचे नमाज बंद होतील असं बाळासाहेबांनी त्या भाषणात म्हटलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाळासाहेबांच्या भाषणाचा व्हिडिओ ट्वीट करून राज ठाकरे यांनी शिवसेनेला बाळासाहेबांच्या भाषणाची आठवण करुन दिली. बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न कधी पूर्ण करणार, असा सवाल राज ठाकरे यांनी शिवसेनेला विचारला आहे. 


यावरून शिवसेना प्रवक्ते संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी राज ठाकरे याना चांगलाच टोला लगावला आहे. राज यांनी जुने ट्टविट टाकले तरी त्यांनी बाळासाहेब आम्हाला सांगू नये. आमचा श्वास बाळासाहेबांच्या विचारांचा आहे. बाळासाहेबांनी रस्त्यावरचे नमाज पर्याय देवून बंद केले. भोंगेही बंद झालेत. त्यांनी पुन्हा बाळासाहेब पुन्हा वाचावेत. तशा कॅसेटस आम्ही त्यांना पाठवतो, असे म्हटलंय. 


मनसेचं आंदोलन आहे कुठे? भोंग्यावर आंदोलन करावं अशी परिस्थिती नाही. मला कुठंही आंदोलन दिसले नाही. तुम्ही बेकायदेशीर भोंगे लावणार असेल तर ते बेकायदेशीरच आहे. आंदोलन कशी करायची हे सेनेकडून शिकावं. काही लोकांचे छंद असतात. हवशे नवशे गवसे असतात. राज्यात ठाकरे सरकार आहे. त्यांना काय करायचे यावर कुणी सल्ले देवू नये, असा टोलाही त्यांनी लगावला. 


मुंबईत सर्व मशिदींनी परवानगी घेत नियमांचे पालन करायचे मान्य केलंय. सर्वोच्च न्यायालयाचा मान राखला जात नसेल तर समान नागरी कायद्याची भाषा बोलू नये. आम्ही या कायद्याची मागणी करतोय. पण, यात राजकीय स्वार्थासाठी चिथावणीची भाषा कुणी करत असेल आणि केंद्र सरकार त्याला बळ देत असेल तर मोदी, शहांनी याची दखल घ्यावी, असे राऊत म्हणाले. 


राज्यात भोंग्याच्या बाबतीत कायद्याचा प्रश्न निर्माण झालेला नाही. सरकार सक्षम आहे. अत्यंत बकवास विधाने करत आहेत. गावागावात होणारी भजन, किर्तन बंद करायची का? डोके ठिकाणावर ठेवून वक्तव्य केले तर बरे होईल. हिंदुत्वाचे धडे देणाऱ्या तुमच्या मास्तरांची डिग्री बोगस आहे का ते तपासा, असेही राऊत म्हणाले.


राज ठाकरे यांना खरे बाळासाहेब किती आठवत आहेत? ज्यांनी बाळासाहेबांना सोडले त्यांचे विचारही सोडले. ते भाजपचे उपवस्त्र म्हणून वावरत आहे. तुमचे बेगडेपण वारंवार सिद्ध होतंय. अशा बेगडी हिंदुत्वाच्या पदराआड लपून, खिशात जावून जे केलं जातंय त्याला जनता साथ देणार नाही, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.