मुंबई : शिवसेना-भाजपमध्ये प्रत्येकी अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या बैठकीत निर्णय झाल्याचं ट्विट युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांनी केलं आहे. जे नेते या वाटाघाटीला हजर नव्हते त्यांनी आपल्या स्वार्थासाठी युतीत खोडा घालण्याचं काम करू नये, असा टोलाही त्यांनी नाव न घेता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लगावला आहे. आता भाजपचे नेते या ट्विटवर काय प्रतिक्रिया देतात याकडे लक्ष लागलं आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून युतीच्या जागावाटपावरून वेगवेगळ्या भूमिका पुढं येत आहेत. त्यात आता वरूण सरदेसाई यांनी ट्विट करत आणखी संभ्रम वाढवला आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप एकत्र निवडणूक लढवणार असली तरी दोन्ही पक्षांमध्ये विविध मुद्यांवरून नाराजीची दरी वाढताना दिसत आहेत. आधी पन्नास पन्नास टक्के जागा वाटपाबाबत भाजपच्या नेत्यांनी केलेल्या विधानामुळे शिवसेनेत नाराजी होती. तर आता मुख्यमंत्री भाजपचाच असेल याबाबत भाजपकडून आखण्यात आलेल्या रणनीतीमुळे शिवसेनेत अस्वस्थता आहे.


ज्या पक्षाच्या जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री हा युतीमधला जुना फॉर्म्युला, आताही हा फॉर्म्युला कायम असला तरी विधानसभेला भाजपचा मुख्यमंत्री करण्यासाठी काम करा असे फर्मान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काढले आहे. त्यामुळेच शिवसेनेतील अस्वस्थता वाढली आहे. 


नुकतीच भाजपच्या कोअर कमिटीची बैठक दिल्लीत पार पडली. या बैठकीत राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीचे 288 पैकी 228 आमदार निवडून आणण्याचं टार्गेट अमित शहा यांनी ठेवलं आहे. मात्र हे टार्गेट पूर्ण करताना मुख्यमंत्री भाजपचाच होईल याची काळजी घेण्याचे आदेशही त्यांनी भाजपच्या नेत्यांना दिले आहेत.