(प्राप्त परिस्थितीत काही राजकीय पंडितांनी वर्तवलेल्या भाकितांवर आधारित हा काल्पनिक सोहळा आहे...! नोंद घ्यावी..! )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कैलास पुरी, झी मिडिया पिंपरी चिंचवड :  पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या प्रांगणात पहावे तिकडे कमळेच कमळे दिसत होती.... आणि त्याच कमळातून वाट काढून कधी काळी शहराचे सर्वे सर्वा असलेले राजे अजितदादा योग्याची वस्त्र घालून संन्यास घ्यायला निघाले होते...सारंग रुपी सारथ्याच्या रथात बसून लक्ष्मण आणि महेश या योध्यानी 'अजित' वाटणाऱ्या दादांचा दारुण पराभव केल्याने आता राजकारण करायचे कसे या विवंचनेत अजित पवार आले आणि त्यांनी अखेर योग्याची वस्त्र परिधान करून सरळ संन्यास घ्यायचा इरादा केला आणि ते निघाले सुद्धा...! 


 पिंपरी चिंचवड नगरीच्या विकासासाठी अजित पवार यांनी खूप कष्ट केलेले.....शहरातील विकासकामे व्यवस्थित होतायेत की नाही या साठी राजे अजितदादा सकाळी सहाला शहरात आलेले नगरीच्या नागरिकांनी पाहिलेले... शहराने मागच्या काही वर्षात झपाट्याने विकास केलेला ही नागरिकांनी पाहिलेले. नाशिक फाटा दुमजली उड्डाणपूल, सायन्स पार्क, यशस्वी बी आर टी, किती तरी उद्याने असे किती तरी बदल शहरात केले. मोठे मोठे रस्ते तर शहराची शान. स्वच्छ भारत अभियानात शहर राज्यात पहिले आले. 
 
 केंद्र सरकारचा बेस्ट सिटी पुरस्कार शहराला मिळलेला. ..पण व्यर्थ ते कष्ट... लक्ष्मण आणि महेश रुपी योद्यांना सारंगाच्या रूपाने पराक्रमी सारथी मिळाला. त्याचे डाव पेच, त्याचे ज्ञान आणि त्याची व्यूव्हरचना अशी काय पडली की घड्याळ बंदच पडले. सारंग या सारथ्याने पिंपरी चिंचवड नगरीच्या कारभारातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला. 
 
 शहराचे महापालिका मुख्यालय म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण आणि या कुराणातील गैर कारभार या सारथ्याने जग जाहीर केला. दररोज एक प्रकरण बाहेर काढत अजित दादांच्या शिलेदारांना त्यांनी सळो की पळो करून सोडले.
 
 लढाई करण्याच्या आधीच राष्ट्रवादीचे शिलेदार घायाळ झाले. घड्याळाचे काटे उलटे फिरायला लागले. आपल्या आपल्या प्रभागरूपी रणांगणात ही ते तग धरण्याची चिन्हे दिसू लागली. ज्या शिलेदारांच्या जीवावर युद्ध करायचे ते शिलेदारच गलितगात्र झाल्यावर मग काय स्वतः अजित पवार यांनी सूत्रे हातात घेतली. पण काय करणार विरोधकांची व्यूहरचनाच अशी होती की या योध्याला पराभव पाहण्याशिवाय काही ही करता आले नाही. किती तरी वर्ष नगरीचे प्रमुख पद भूषवले. नगरीच्या विकासासाठी किती तरी कष्ट उपसले. पण एवढे करून ही पराभव. हा पराभव जिव्हारी लागणारच. 
 
 नगरीतल्या किती तरी योध्याना स्वत: राजकारण युद्धकलेत निपुण केलेले. आता त्याच योध्याकडून पराभव म्हणजे राजकारण या कलेत आपल्या डावपेच कालबाह्य झाल्याचच द्योतक.  मग ही खंत अखेर या पराभूत राजाला स्वस्थ बसू देईना. काय करायचे या विचारात या पराभूत योध्याचे दिवस रात्र जाऊ लागले...एवढे करून ही पराभव पाहावा लागत असेल तर त्या राजकारण रुपी कलेत मन तरी कसे रमवायचे, हा विचार राजाला स्वस्थ बसू देत नव्हता.. 
 
 पिंपरी चिंचवड महानगर पालिका रुपी रणांगतला हा पराभव म्हणजे  आपण कोठेच नाही हे दाखवणारा.. काय करायचे हा विचार स्वस्थ बसू देत नसतानाच अचानक राजकारण रुपी मोहाचा पराभूत राजाला तिटकारा आला आणि एक निर्णय झाला..संन्यास राजकीय संन्यास..


 ठरल्या प्रमाणे पराभूत अजितदादांनी योग्याची वस्त्र परिधान केली आणि ते निघाले सुद्धा...जाताना कमळाचा एक फटकारा पायाला लागलाच आणि पायातून रक्त आलेच..पण माघार नाही.. अटीतटीच्या लढाईत ज्या सरसेनापतींनी नगरीतले आपले गड राखले ते घड्याळाचे शिलेदार हवालदिल झाले.. दूर कमळवाले हा सोहळा तृप्त नजरेने पाहायला लागले आणि पिंपरी चिंचवड नगरीत एक राजकीय वर्तुळ पूर्ण झाले...!


(प्राप्त परिस्थितीत काही राजकीय पंडितांनी वर्तवलेल्या भाकितांवर आधारित हा काल्पनिक सोहळा आहे...! नोंद घ्यावी..!)