धनंजय शेळके :  मुंबईत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होते, वेगवेगळ्या मुद्यांवर अत्यंत गहन चर्चा होते, ( त्यापैकी एक मुद्दा माध्यमांमध्ये बातमी काय पेरायची याची) आणि अशी ही बैठकीतील अत्यंत गुप्त चर्चा आणि त्यात ठरलेली संपूर्ण स्ट्रॅटर्जी मग कोअर कमिटीचे सदस्य चॅनल आणि वर्तमानपत्रांच्या राजकीय प्रतिनिधींना अत्यंत पारदर्शकपणे ( नाव न सांगण्याच्या अटीवर) सांगतात. आणि मग चॅनलवर सूत्रांच्या माहितीने बातम्या सुरू होतात आणि लाईव्ह शाईव्हही.... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेची कटकट संपवण्यासाठी, राज्यातील अस्थिरता संपवण्यासाठी भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे बरोब्बर 29 आमदार फोडणार, त्यापैकी 15 काँग्रेसचे आणि 14 राष्ट्रवादीचे. काही आमदार म्हणे स्वतःहून भाजपच्या संपर्कात आहेत तर भाजपचे नेते काही आमदारांच्या संपर्कात आहेत. वा देवेंद्रजी, मान गए, आपल्या पारदर्शक कारभाराला. एवढी कॉन्फिडिन्शअल चर्चा, तीही आमदार फोडाफोडीची ( माफ करा इथे सर्व चॅनलनी फोडाफोडी असा शब्द वापरला म्हणून आम्हीही फोडाफोडी हा शब्द वापरत आहोत. तुमच्या भाषेत तुम्ही याला रणनितीच समजा. ) संपूर्ण स्ट्रॅटर्जीजीसह माध्यमांपर्यंत पोहचवली.


एवढा परफेक्ट प्लॅन केलेला असताना दोन हातचेही राखुन ठवले आहेत. म्हणे भाजपातल्या मुख्यमंत्री, तावडे यांच्यासारख्या आक्रमक नेत्यांना हा फोडाफोडीचा (रणनितीचा) प्रकार मान्य नाही. मध्यावधी निवडणूकांचा पर्याय निवडावा असं त्यांनी सूचवलंय. त्यासाठी म्हणे त्यांनी अंतर्गत सर्व्हेही केलाय. त्यामध्ये भाजपला 200 च्या आसपास जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. तुमचा सर्व्हे जर 200 जागा भाजपला दाखवत असेल तर मग तोच पर्याय तुम्हाला योग्य होणार नाही का ? चला तुमचा सर्व्हे थोडासा  चुकला असे समजू तरी किमान 150 जागा तुमच्या पक्षाला नक्कीच मिळतील. मग फोडाफोडीपेक्षा मध्यावधी निवडणुकीचा पर्यायच चांगला नाही का ? 


 दुसरा हातचा म्हणजे दिल्लीतील श्रेष्ठींच्या सल्ल्याचा. म्हणे ही संपूर्ण स्ट्रॅटर्जी मोदी आणि शहांना सांगितली जाणार आहे. आणि त्यानंतर याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. राज्यातले कोअर कमिटीचे सदस्य दिल्लीला जातील. मोदी शहांना भेटतील, मग मोदी शहा राज्यातील नेत्यांना सबुरीचा सल्ला देतील. शिवसनेशी जुळवून घेण्याचा सल्ला देतील. आणि राज्यातले नेते पुन्हा मुंबईत येतील आणि पुन्हा चॅनलच्या प्रतिनिधींना अशीच माहिती पुरवली जाईल. आमदारांच्या फोडाफोडीला मोदी शहांचा विरोध, यामुळे पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम होईल वगैरे वगैरे.... मग पुन्हा बातम्या सुरू भाजपने फोडाफोडीचा प्लॅन थांबवला, मोदी शहा कसे फोडाफोडीच्या विरोधात आहेत आणि बरंच काही.....


 इथं काही प्रश्न पडतायेत. 29 आमदारांचा आकडा कसा आला ?  अगदी बरोबर एवढे आमदार तुमच्या संपर्कात आहेत असंही नाही. चॅनलवर पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार काही आमदार तुमच्या संपर्कात आहेत तर तुमचे नेते काही आमदारांच्या संपर्कात आहेत. मग 29 आकडा कसा आला. त्यात मग काँग्रेसचे 15 आणि राष्ट्रवादीचे 14 हे कसं काय ? शिवसेनेचा एकही आमदार नाराज नाही का ? की तुम्ही तुमचा मित्र म्हणून त्यांचे आमदार फोडायचे नाही असं काही ठरवलं आहे ?


 विरोधकांना धाकात ठेवण्याची तर ही खेळी नाही ना ?   कर्जमाफीच्या मुद्यावरुन सरकार अडचणीत आलंय. शिवसेना कधी काय करेल याचा तुम्हाला भरवसा नाही. त्या भीतीपोटीच तुम्ही म्हणे विरोधकांचे 19 आमदार निलंबित केले. त्यावर कडी म्हणून विरोधकांनी संपूर्ण कामकाजावरच बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलाय. एवढच नाही तर राज्यात कर्जमाफीच्या मुद्यावरुन चांद्यापासून बांद्यापर्यंत संघर्ष दिंडी काढण्याचा इशारा दिलाय. त्यामुळं शेतक-यांमध्ये सरकारच्या विरोधात रोष निर्माण होण्याची शक्यता आहे. विरोधकांच्या या संघर्ष रॅलीत शिवसेना सामिल झाली तर मग खूपच अडचण होईल.  हे सर्व टाळण्यासाठी आणि शिवसेनेसह विरोधकांनी असे काही करु नये यासाठी त्या दोघांना धाकात घेण्याची तर ही खेळी नाही ना ?