ब्लॉग : भारताच्या शूरवीरांना सलाम!
हेमंत महाजन,
माजी ब्रिगेडियर
जम्मू-काश्मीरमधील गुरेज सेक्टर येथे झालेल्या हिमस्खलनात 15 जवान हुतात्मा झाले असून, महाराष्ट्रातील तीन जवानांचा यामध्ये समावेश आहे. अकोल्याचे आनंद गवई, संजय खंडारे व बीडचे विकास समुद्रे हे जवान हिमस्खलनात हुतात्मा झाले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. 25 जानेवारी संध्याकाळी दोन मोठे हिमस्खलन झाले होते. पहिल्यांदा सैन्याचा एक कॅम्प हिमस्खलनात अडकला. त्यानंतर गस्तीवर असलेले काही जवान हिमस्खलनात अडकले. यामध्ये 15 जवानांचा मृत्यू झाला आहे. हिमस्खलन झाल्यामुळे बर्फाच्या कड्याखाली सापडून या जवानांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली.
अशा घडल्या दुर्घटना बंदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळच हिमस्खलनाच्या या दोन विचित्र घटना घडल्या आहेत. पाकव्याप्त काश्मीरला गुरेजची सीमा लागून असल्याने इथे जवानांचा कडेकोट बंदोबस्त असतो. बर्फाची कडा कोसळल्यानं अनेक जवान बर्फाखाली दबले गेले आहेत. भारतीय लष्कराच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'खराब हवामानामुळे जवानांचे मृतदेह अद्यापही तिथेच आहेत. हवामान स्वच्छ झाल्यानंतर जवानांचे मृतदेह हेलिकॉप्टरच्या मदतीने श्रीनगरला व त्यांच्या घरी पोहोचवले गेले.
गुरेझमधील हिमस्खलनानंतर बेपत्ता झालेल्या चार सैनिकांचे मृतदेह आढळून आले. सात जणांना गुरुवारी जिवंत बाहेर काढण्यात यश आले. तथापी, १० सैनिकांना वाचविता येऊ शकले नाही. बचाव पथकांना त्यांचे मृतदेहच आढळले.
काश्मीर खोऱ्यातील डोंगरी भागात प्रशासनाने हिमस्खलनाचा इशारा दिला आहे. हिमवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे बनिहाल-रामबन सेक्टरमध्ये अनेक ठिकाणी हिमस्खलन आणि दरडी कोसळल्या. त्यामुळे महामार्ग वाहतूकयोग्य बनविण्याचे काम विस्कळीत झाले आहे. महामार्गावरील दरडी, बर्फ हटवून तो वाहतूकयोग्य बनविण्यासाठी बीआरओची पथके झटत आहेत, असेही त्यांनी सांगितले. तुफान हिमवृष्टीमुळे बुधवारी हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. हिमस्खलन बचाव पथकांनी (एआरटी) शहीद जवानांचे मृतदेह हुडकून काढले.
२५ रोजी सायंकाळी ५ वाजता गुरेझ खोऱ्यात महाझगुंड गावाजवळील लष्करी छावणीला हिमस्खलनाचा तडाखा बसला. यात तीन तंबू बर्फाखाली गाडले जाऊन सैनिक अडकले. छावणीतील इतर सैनिक आणि महाझगुंड गावातील लोकांनी तात्काळ मदतकार्य केल्यामुळे सहा सैनिकांचे प्राण वाचले.
दुर्दैवाने तीन सैनिकांना वाचविता येऊ शकले नाही. एआरटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी या सैनिकांचे मृतदेह बाहेर काढले. याच वेळी गुरेझच्या निरू भागाजवळ लष्कराचे गस्ती पथक हिमस्खलनाच्या तडाख्यात सापडून ११ सैनिक बर्फाखाली अडकले. यापैकी एकाही सैनिकाला वाचविता येऊ शकले नाही.
पराक्रमी मेजर श्रीहरी कुगजी
सियाचीनमध्ये तब्बल सहा दिवस उणे ४५ तापमानात 25 फूट बर्फाखाली गाडले गेलेल्यानंतरही सहा दिवसांनंतर बाहेर आलेले जिगरबाज लान्सनायक हनुमंतप्पा कोप्पड यांनी मृत्यूशी दिलेली झुंज आपल्याला माहीत आहेच. त्यांची पुन्हा आठवण करून देणारा पराक्रम बेळगावमधील मेजर श्रीहरी कुगजी यांनी केला आहे. १५ फूट बर्फाखाली अडकलेल्या कुगजी यांनी कुलुपाने बर्फ फोडून मृत्यूवरही मात केली.
जम्मू-काश्मीरमधील सोनमर्गमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रचंड हिमवृष्टी होत होती. मेजर श्रीहरी कुगजी याच भागात कर्तव्य बजावत होते. त्यावेळी हिमस्खलनामुळे छावणीचं छप्पर कोसळलं आणि ते १५ फूट बर्फाखाली अडकले. सुटकेचा मार्गच दिसत नव्हता. ते अशा ठिकाणी होते की बचाव पथकाच्या दृष्टीस पडणंही अशक्य होतं. पण जिगरबाज कुगजी यांनी हार न मानता लढायचं ठरवलं.
बर्फ फोडण्यासाठी काही हाती लागतंय का, यासाठी झटापट सुरू केली. तेव्हाच त्यांच्या हाती ट्रँकेचं कुलूप लागलं आणि त्यांच्या आशा पल्लवित झाल्या. प्रयत्नांची पराकाष्ठा करत त्यांनी कुलुपाने बर्फ फोडण्यास सुरुवात केली. हळूहळू त्यांचं एकेक बोट बर्फाबाहेर येऊ लागलं. साधारण तीन तास ते झगडत होते. त्याला नशिबाची साथ मिळाली आणि बचाव पथकाला कुगजी यांची बोटं दिसली. त्यानंतर, सहकारी जवानांनी बर्फ फोडून त्यांना बाहेर काढलं आणि या जिद्दीपुढे मृत्यूनं गुडघे टेकले.
रस्त्यावर चार फूट बर्फाचा थर असल्यानं वाहतूक पूर्णपणे बंद होती आणि हवामान खराब असल्याने हेलिकॉप्टरही तिथे पोहोचू शकत नव्हते. परंतु, त्यांचा पराक्रम बेळगावपर्यंत पोहोचला असून या धाडसाला सगळेच सलाम करत आहेत.
लष्कारांकडून जवानांची काळजी घेतली जाते. लष्कारांकडून जवानांची खूप चांगल्या रीतीने काळजी घेतली जाते. तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्या तब्येतीकडे लक्ष ठेवून असते. त्यांच्या रोजच्या खाण्याकडेही लक्ष दिले जाते. हिमालयाच्या या परिसरात चढाई करताना पचनक्षमता कमी झालेली असते. शरीरामध्ये असलेल्या चरबीचा वापर करून ती शक्ती शरीर वापरत असते. लवकर शिजणारे अन्न या ठिकाणी हवे असते. त्यादृष्टीने प्रयत्न केले जातात. बर्फामुळे होणाऱ्या आजारांविषयीची माहिती वेळोवळी दिले जाते.
भारतीय सैन्याविषयी भारतीयांच्या मनामध्ये आदर आहे. आता पर्यंत ९००० हून जास्त सैनिकांचे रक्त वाहिले, किती तरी जखमी झाले आहेत आणि दुर्दैवाने पुढे पण होतील पण त्यांचे कार्य आणि देशासाठी असलेले प्रेम या जगात नेहमीच अमर राहील.
राष्ट्रीय रायफल्सच्या टीमने प्रतिकूल परिस्थितीतही केला दहशतवादी बुरहान वानीचा खात्मा
जुलै २०१६ मध्ये हिजबुल मुजाहिदीनचा काश्मिरी कमांडर बुरहान वानीसहित काही दहशतवाद्यांच्या खात्मा करणाऱ्या राष्ट्रीय रायफल्सच्या तीन जवानांना सेना पदकाने गौरवण्यात आले आहे. या ऑपरेशनमध्ये सहभागी झालेले मेजर संदीपकुमार, कॅप्टन माणिक शर्मा आणि नायक अरविंदसिंह चौहान यांना हे पदक देण्यात आले आहे. ८ जुलै रोजी झालेल्या या ऑपरेशनमध्ये गुप्तचर सूत्रांकडून मेजर संदीपकुमार यांना बमदुरा गावात सरताज अजीज व इतर दोन दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती.
अनंतनागपासून १८ किमी. दूर असलेल्या या गावाला घेरण्यात आले होते. मेजर संदीपकुमार, कॅप्टन माणिक शर्मा आणि नायक अरविंदसिंह चौहान यांना या दहशतवादी ज्या घरात लपून बसले होते त्या घरावर हल्ला करण्यासाठी अनेक तास वाट पाहावी लागली. या कारवाईविरोधात मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येऊन लष्कराच्या तुकडीवर दगडफेक करत होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली होती. 'असॉल्ट टीम'चे नेतृत्व करत असलेल्या कॅप्टन शर्मा आणि त्यांच्या टीमने घरात घुसण्याचा प्रयत्न केला. पण ग्रामस्थांनी तुफान दगडफेक केल्याने त्यांना परतावे लागले होते.
संध्याकाळ होत होती. लोकांकडून आमच्यावर तुफान दगडफेक करण्यात येत होती. त्यामुळे आम्ही प्रत्येक क्षण मोजत घराला घेरण्याची योजना बनवत होतो. मेजर कुमार आणि त्यांच्या टीमने घरात घुसण्याचा आणखी एक प्रयत्न करून पाहिला पण दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरूवात केली. अजीजने पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. परंतु त्याला घटनास्थळीच यमसदनास धाडले. वेळ निघून चालली होती आणि आत आणखी दोन दहशतवादी होते. जसजसा विरोध वाढू लागला. तेव्हा मेजर कुमार यांनी एका स्थानिक इमामला पाठवून ग्रामस्थांना शांत करण्याचा प्रयत्नक केला. अंधार पडण्यास सुरूवात झाली होती. पण ग्रामस्थांचा राग काही कमी होत नव्हता.
मेजर आणि त्यांच्या जवानांनी घरात घुसण्याचा प्रयत्न केला. परंतु दोन्ही दहशतवाद्यांनी पळून जाण्यासाठी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात लष्करी ठार झाला. त्यानंतर उर्वरित दहशतवाद्यांनाही मारण्यात आले. नंतर समजले की शेवटचा दहशतवादी हा हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वानी होता. काश्मीर खोऱ्यात तो पोस्टर बॉय म्हणून प्रसिद्ध होता. त्याच्यावर १० लाख रूपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते.
शहीद हवालदार हंगपन दादा - अशोकचक्र
शहीद हवालदार हंगपन दादा यांनी जम्मू-काश्मीरमधील एका एन्काऊंटरमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. हंगपन दादा यांना गुरुवारी प्रजासत्ताक दिनी अशोकचक्र या सर्वोच्च शौर्य पुरस्काराने गौरवण्यात आले. राजपथावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांची पत्नी चासेन लोवांग यांना सन्मानीत केले. अशोकचक्र हे शांतीकाळातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे. परमवीर चक्रच्या बरोबरीचे ते आहे.
उत्तर काश्मीरमधील कुपवाडा येथे 27 मे रोजी 12500 फूट उंचावर दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्नात होते. 36 वर्षांच्या हंगपन दादा यांनी दहशतवाद्यांसोबत दोन हात करत बहादूरीचे दर्शन घडविले. त्यांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते, मात्र त्यांनी हार मानली नाही. चौथ्या दहशतवाद्यालाही त्यांनी यमसदनी धाडले.
हंगपन दादा हे अरुणाचल प्रदेशातील बोदुरिया गावचे रहिवासी होते. हंगपन यांना त्यांचे टीम मेंबर दादा नावाने संबोधत होते. गेल्या वर्षी ते हाय माऊंटन रेंजमध्ये तैनात होते. हंगपन 1997 मध्ये आसाम रेजिमेंटमध्ये भरती झाले होते. त्यानंतर 35 राष्ट्रीय रायफल्समध्ये त्यांची नियुक्ती झाली होती. हंगपन यांच्या नावाने एक ब्लॉकचे नाव देण्यात आले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये शिलाँग येथे आसाम रेजिमेंट सेंटर येथे प्लॅटिनम ज्युबली साजरी झाली. या उत्सवात एका अॅडमिनिस्ट्रेटीव्ह ब्लॉकला हंगपन यांचे नाव देण्यात आले. हंगपन यांच्यावर एक माहितीपट (डॉक्युमेंटरी) तयार करण्यात आला आहे. अॅडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पब्लिक इन्फर्मेशन यांनी प्रजासत्ताक दिनी या माहितीपटाचे उद्घाटन केले. हंगपन यांच्यावरचा माहितीपट (डॉक्युमेंटरी) यु ट्यूब वर THE WARRIORS SPIRIT -ASHOKA CHAKRA WINNER HAVALDAR HANGAPAN DADA - https://www.youtube.com/watch?v=ZVMxgF-DLdg
या दुव्यावर उपलबद्ध आहे. आत्तापर्यंत लाखो लोकांनी हा माहितीपट बघितला आहे.
भारताचा निष्ठावान, कर्तव्यदक्ष, राष्ट्रभावनेने प्रेरित आमचा शूर सैनिक, ज्याच्या गळा विजयश्रीची देदीप्यमान, गौरवशाली माळा दिमाखाने झळकत असताना त्याच वेळी तो देशसंरक्षणासाठी आपल्या हत्यारांची साफसफाई करण्यात मग्न आहे. त्याचे कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रसंगी प्राणांची आहुती द्यायला सज्ज आहे. कटिबद्ध आहे. त्याला कोणी शाबासकी देवो अथवा न देवो. अशा या शूरवीरांना मानाचा मुजरा...
जय हिंद, जय जवान, जय भारत