पहिल्यांदाच परदेश दौरा आखताय... मग हे पाहाच!
शुभांगी पालवे, प्रतिनिधी मुंबई
(shubha.palve@gmail.com)
अनेक जण परदेश दौऱ्याची स्वप्न पाहत असतात... शिक्षणाच्या, कामाच्या किंवा फिरण्याच्या निमित्तानं अशीच एखादी संधी तुम्हालाही अचानक मिळाली तर...
नक्कीच तुम्हाला आनंद होईल... परंतु, तुमच्या एखाद्या छोट्याशा चुकीमुळे तुमच्या या आनंदावर विरजणही पडू शकतं. त्यासाठी अगोदरच आपल्या नियोजित परदेश दौऱ्याचा तुमचा प्लान तयार असेल तर मिळालेल्या संधीचं सोनं तुम्ही करू शकता... शिवाय तुमच्या खिशाला भुर्दंडही पडणार नाही.
पासपोर्ट
परदेश दौऱ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट... तुमच्या देशानं तुम्हाला दिलेलं हे ओळखपत्र... तुम्हाला परदेश भेटीची ओढ असेल तर लगेचच पासपोर्टसाठी अर्ज दाखल करा. www.passportindia.gov.in/ या वेबसाईटवर तुम्हाला पासपोर्टसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करून अपॉईंटमेंट मिळवता येईल. यानंतर भरलेल्या अर्जासहीत वेबसाईटवर उल्लेख केल्याप्रमाणे आपल्याकडे आवश्यक ती कागदपत्रं आहेत का? हे तपासून घ्या आणि पासपोर्टसाठी अर्ज दाखल करा. तुमचा पासपोर्ट तयार असेल तर केव्हाही त्याचा वापर करण्यासाठी तुम्ही मोकळे...
व्हिजा
तुम्ही ज्या देशात जाणार आहात त्या देशानं तुम्हाला प्रवेश करण्याची दिलेली ही परवानगी... परदेश दौऱ्याचं तुमचं ठिकाण निश्चित झाल्यानंतर त्या देशाच्या व्हिजा सेंटर किंवा एम्बेसीला भेट देऊन तुम्ही व्हिजासाठी अर्ज दाखल करू शकता. बहुतेक देशांचे व्हिजा अर्ज ऑनलाईनही उपलब्ध असतात.
व्हिजासाठी तुम्ही स्टुडंड, व्हिजिटर किंवा बिझनेस व्हिसासाठी अर्ज दाखल करू शकता. व्हिजासाठी त्या त्या देशाने निश्चित केलेली ठराविक फी आकारली जाते. व्हिजा सेंटरमध्ये अर्ज दाखल करताना तुमचे ओरिजिनल कागदपत्रं आणि झेरॉक्स तुमच्यासोबत ठेवा.
व्हिजा स्वीकारताना तुमच्या पासपोर्टवर चिटकवण्यात आलेल्या व्हिजावर तारखा आणि कालावधी योग्य आहेत किंवा नाहीत याची खातरजमा करून घ्या.
व्हिजा ऑन अरायव्हल / ट्रान्झिट व्हिजा
काही देशांत 'व्हिजा ऑन अरायव्हल'चाही ऑप्शन उपलब्ध आहे. यामध्ये, त्या देशात गेल्यानंतर तुम्हाला व्हिजा एअरपोर्टवर उपलब्ध होतो.
समजा, तुम्ही भारतातून ऑस्ट्रेलियाला निघाला आहात. पण, मधेच तुम्हाला सिंगापूरला काही वेळ फिरण्यासाठी वापरायचाय... तर तुम्हाला ट्रान्झिट व्हिजाचाही ऑप्शन उपलब्ध आहे. ठराविक दिवसांसाठी ट्रान्झिट व्हिजा घेऊन तुम्ही एका देशात फेरफटका मारल्यानंतर दुसऱ्या देशाकडे आगेकूच करू शकता. म्हणजेच एकाच दौऱ्यात तुम्हाला दोन देशांत फिरण्याचा ऑप्शनही उपलब्ध होऊ शकतो.
करन्सी एक्सचेंज / परकीय चलन
परदेश दौरा आखताना तुमच्याकडे त्या त्या देशातील चलन असणं आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हाला परदेशात व्यवहार किंवा शॉपिंग करणं सोप्पं जातं.
परकीय चलन मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्याच शहरांतील करन्सी एक्सचेंज ऑथोराइज्ड सेंटर्स, बँक किंवा CURRENCY EXCHANGE (मुंबईत) सारख्या मोबाईल अॅप्लिकेशन्सचा वापर करू शकता. तुम्ही विमानतळावरही करन्सी एक्सचेंज करू शकता. परंतु, बहुतेकदा एअरपोर्टवर तुम्हाला परकीय चलन महागात पडू शकतं.
करन्सी एक्सचेंज करताना तुम्हाला भारतीय चलनाशी परकीय चलनाची तुलना करून आवश्यक तेवढेच पैस जवळ बाळगा. अन्यथा, ट्रव्हल कार्ड, ट्रव्हलर्स चेक अशा ऑप्शनचाही तुम्ही वापर करू शकता.
विमान तिकीट
विमान तिकीट काढण्यासाठी तुम्ही makemytrip.com किंवा सरळ विमानकंपनीच्या वेबसाईटला भेट देऊ शकता. येण्याच्या आणि जाण्याच्या तारखा निश्चित असतील तर दोन्ही विमानप्रवासाची तिकीटं एकत्रच बुक करा. त्यामुळे तुम्हाला स्वस्तात ही तिकीटं उपलब्ध होऊ शकतील.
चेक इन
विमानप्रवासाच्या निश्चित वेळेच्या काही तास (२४ तास) अगोदर ऑनलाईन चेक इनचा पर्याय तुम्हाला उपलब्ध होतो. यासाठी तुम्हाला तुमच्या एअरलाईनच्या वेबसाईटला भेट देऊन तुम्हाला हवी असलेली सीट मिळवता येऊ शकते.
सामानाचं वजन
एखादी व्यक्ती आपल्यासोबत किती वजनाचं सामान घेऊन जाऊ शकते, याला काही मर्यादा असतात. तुम्ही निवडलेल्या एअरलाईन्सच्या नियमांप्रमाणे तुम्ही 'चेक इन'च्या बॅगेत आणि 'हॅन्ड लगेज'मध्ये किती वजन घेऊ शकता यावर एकदा नजर टाकून मगच तुमचं पॅकिंग करा.
तुम्ही ज्या देशात जाणार आहेत त्या देशांत कुठल्या वस्तू बॅन आहेत का? हेही एकदा तपासून पाहा... उदाहरणार्थ, काही गल्फ देशांमध्ये खसखस बॅन आहे... तर काही देशांमध्ये विशिष्ट औषधंही बॅन आहे.
या गोष्टी ध्यानात घेतल्या तर तुम्ही एकटेही अगदी सहजपणानं तुमचा परदेश दौरा एन्जॉय करू शकाल... मग, कुठल्या देशात घेताय तुमची पहिली भरारी...?