प्रशांत जाधव, झी मीडिया, मुंबई :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १ हजाराच्या नोटा बंदी करून कॅशलेस ट्रान्सक्शनला प्रोत्साहन देणारा धाडसी आणि लोकप्रिय निर्णय घेतला. या निर्णयाला साथ देत भाजीवाले, पानवाले  या सारख्या छोट्या दुकानदारापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाचे व्यवहार कॅशलेस करण्याकडे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले.... पण आज या निर्णयाला २७ दिवस झाले तरी प्रभूंची रेल्वे कॅशलेसच्या बाबतीत लेट धावते आहे. 


८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर 'प्रभूं'ची गाडी लेट 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी नोट बंदीचा निर्णय घेतल्यानंतर आम्ही एलफिन्स्टन स्टेशनवरील तिकीट घरावर चौकशी केली. त्यावेळी त्यांच्याकडे कार्ड स्वॅप करण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. आजही अशा प्रकारचे तिकीट खिडकीवर चौकशी केली तर कार्ड स्वॅपची सुविधा आजही नाही आहे. 


प्रभूंच्या लक्षात आलेच नाही का...


सध्या सामान्य माणूस हा मोदींच्या निर्णयाचे स्वागत करत आहे. आपले दैनंदिन व्यवहार कॅशलेस करण्याचा प्रयत्न करीत आहे. अनेक प्रकारचे कॅश व्हॉलेट आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून पेमेंट करीत आहे. पण मोदींच्या कॅशलेस भारताच्या संकल्पनेला सुरेश प्रभू हरताळ तर नाही फासत आहे नाही ना अशी शंका सामान्यांच्या मनात येत आहे. कॅशलेस सुविधा रेल्वेत उपलब्ध करून द्यावी याची 'आयडीयाची कल्पना' सुरेश प्रभूंना का आली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 


महाराष्ट्रात कॅशलेस व्यवहार 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या खतांसाठी कॅशलेस सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बँकांच्या प्रतिनिधींशी तात्काळ बैठक घेतली.  त्यानुसार यंत्रणा सुरू करण्याचे एक पाऊल पुढे टाकले. तसेच राज्यातील सर्व विद्यापीठांना कॅशलेस व्यवहार करण्याचे आदेश देण्यात आले. असे सकारात्मक बदल होत असताना रेल्वे नेहमी प्रमाणे लेट का होते, या प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.