राजकारण गडाचं
मागील अनेक वर्षांपासून भगवानगड येथे सुरु असलेली दसरा मेळाव्याची परंपरा यावर्षी खंडित होण्याची शक्यता आहे. गडाचे महंत नामदेव शास्त्री सानप आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यातील वाद पराकोटीला गेला आहे.
लक्ष्मीकांत रुईकर,बीड : मागील अनेक वर्षांपासून भगवानगड येथे सुरु असलेली दसरा मेळाव्याची परंपरा यावर्षी खंडित होण्याची शक्यता आहे. गडाचे महंत नामदेव शास्त्री सानप आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यातील वाद पराकोटीला गेला आहे. महंत यांनी राजकीय भाषण करण्यास मनाई केली आहे तर पंकजा यांनी आज चलो भगवानगड चलो भगवानगड असे ट्विट करून दसरा मेळावा होणारच असे संकेत दिले आहेत. त्यामुळे भगवानगडावर मोठा राडा होण्याची चिन्हे आहेत.
स्व. गोपीनाथ मुंडे यांनी गेल्या वीस पंचवीस वर्षांपासून भगवानगड येथे दसरा मेळावा घेण्यास प्रारंभ केला होता. दरवर्षी मुंडे अनेक राजकारणी मंडळींना घेऊन गडावरून राजकीय भाषण करायचे. वंजारी समाजाला संदेश देण्याचं हे हक्काचं व्यासपीठ होत. मुंडे यांनी गडावरून काढलेला फतवा सर्वमान्य असायचा
दरम्यान मुंडे यांच्या मृत्यूनंतर पंकजा यांनी परळीत गोपीनाथ गडाची निर्मिती केली तेव्हा दहा महिन्यांपूर्वी नामदेव शास्त्री यांनी आता यापुढे भगवान गडावरून राजकीय भाषण होणार नाही असे जाहीर केले होते. त्यामुळे यंदा दसरा मेळावा होणार की नाही याबाबत शंका होती. पंकजा समर्थक आणि शास्त्री समर्थक यांच्यात मागील आठवड्यात गडावर हाणामाऱ्या झाल्या होत्या. शास्त्रींवर गुन्हाही दाखल झाला होता.
त्यामुळे येथे मेळावा होणार नाही अशी शक्यता होती. मात्र पंकजा यांनी आज फेसबुक आणि ट्विटरवरून चलो भगवानगड चलो भगवानगड असे म्हणत मी येणार तुम्ही येणार ना असे आवाहन केले आहे. एकंदरच पंकजा यांच्या या ट्वीटमुळे गडावरील दसरा मेळाव्याचा वाद वाढणार यात शंका नाही.
महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या वेगळ्या कार्यशैलीमुळे परिचित असलेले स्व.गोपीनाथ मुंडे यांची ओळख महाराष्ट्राला आणखी एका कारणामुळे आहे ती म्हणजे भगवानगड. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या सीमेवर पाथर्डी तालुक्यात असलेला भगवानगड विशेष चर्चेत आला तो मुंडे यांच्या मुळेच. साधारणपणे 12 वर्षांपूर्वी गोपीनाथ मुंडे यांनी भगवानगडच्या गादीवर नामदेव शास्त्री सानप यांना बसवले.
मुंडे आणि गड हे समीकरण राज्याच्या राजकारणात मागील दहा बारा वर्षात परिचित झाले होते. दरवर्षी भगवान बाबाच्या पुण्यतिथी आणि जयंतीनिमित्त गडावर मोठी यात्रा भरते. तसेच विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या दिवशी मुंडे देशात कोठेही असले तरी गडावर येत आणि त्या ठिकाणी त्यांची टोलेजंग सभा होई. अगदी दीड वर्षांपूर्वी मुंडे केंद्रात मंत्री झाल्यानंतर राज्यात सर्वप्रथम आले ते भगवान गडावर. या गडाने मुंडेंच्या मागे मोठी ताकद उभी केली. विशेषतः वंजारी समाजाची एकगठ्ठा मते मुंडेंच्या मागे गडामुळे राहिली. त्यामुळेच राज्यातील सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधी पक्षातील लोकही मुंडेंच्या या ताकदीपुढे नतमस्तक होत असत.
मुंडे यांच्या अकाली निधनानंतर भगवान गडावरून महंत नामदेव शास्त्री सानप यांनी पंकजा मुंडे यांना गडाची मानसकन्या जाहीर केले. मुंडेंच्या दहाव्या आणि तेराव्या दिवशी नामदेव शास्त्री यांनी आपली भूमिका मांडली होती. तेथेच गोपीनाथ गडाची मुहूर्त मेढ रोवली गेली आणि सुरु झाला भगवान गड (नामदेव शास्त्री)आणि पंकजा मुंडे यांच्यातील संघर्ष.
गोपीनाथ गड हा येणाऱ्या भावी पिढ्यांसाठी प्रेरणा देणारा ठरावा हा पंकजा यांचा उद्देश होता त्यात वावगे असे काहीच नव्हत. मात्र गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती दिवशी शास्त्री यांनी गोपीनाथ गड हा राजकीय गड असेल आणि भगवानगड हा धार्मिक गड असेल. या पुढे भगवान गडावर राजकीय भाषणे होणार नाहीत असे जाहीर केले आणि उपस्थित सर्वांच्या भुवया उंचावल्या.
आजपर्यंत भगवान गडावरून मुंडे राजकारण करतात अशी दबक्या आवाजात होणारी चर्चा शास्त्रींच्या घोषणेमुळे खुलेआम झाली. कदाचित येथेच पंकजा आणि शास्त्री यांच्यातील संघर्षाची ठिणगी पडली असावी.
राज्यामध्ये भगवानगडला मानणारा मोठा समाज आहे. केवळ वंजारी समाजाचा गड अशी असणारी प्रतिमा आजही कायम आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. या गडावर सर्व जाती धर्मातील लोक श्रद्धेने येतात परंतु मुंडे यांचा गडावरील वावर पाहता हा गड वंजारी समाजाचा असावा असा अनेकांचा समज आहे.
भगवान गडावरून यापुढे दसरा मेळाव्यात राजकीय भाषण होणार नाही असा निर्णय नुकताच नामदेव शास्त्री यांनी जाहीर केला. मध्यंतरी पंकजा आणि शास्त्री यांच्यात धुसफूस सुरु असल्याच्या बातम्या होत्या. काही कार्यक्रमानिमित्त पंकजा या गडावर गेल्या तेव्हा शास्त्री आणि त्यांच्यात विसंवाद वाढल्याच्या सुरस बातम्या आल्या होत्या त्याचे खंडन ना पंकजा यांनी केले ना शास्त्रींनी केले. दसरा मेळावा होणार की नाही यावरून शास्त्री विरुद्ध काही पुढाऱ्यांनी शेरेबाजी देखील केली होती. पंकजा यांना मानस कन्या जाहीर केल्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्नदेखील गडावर झाला होता हे सर्वश्रुत आहे. अशा वातावरणात गड(शास्त्री) आणि पंकजा यांच्यात दुरावा आल्याचे स्पष्ट जाणवत होते.
पंकजा यांना गड ताब्यात घ्यायचा आहे तर शास्त्रींना कोणाची लुडबूड नको आहे अशा चर्चा जोरात सुरु आहेत. कोण चूक कोण बरोबर यावर मतमतांतरे असू शकतील मात्र सुरु असलेला वाद समाजाला देखील मान्य नसल्याचे दिसते. राज्याच्या राजकारणात आपला दबाव कायम ठेवायचा असेल तर समाजाची ताकद आपल्या मागे कायम कशी राहील यासाठी गड आपल्या ताब्यात कसा राहील यासाठी पंकजा यांचा प्रयत्न सुरु असल्यास त्यात वावगे काहीच नाही कारण स्व.गोपीनाथ मुंडे यांचा राजकारणात दबदबा निर्माण करण्यात गडाचा सिंहाचा वाटा होता हे कोणीच अमान्य करणार नाही. त्यामुळे गडाची ताकद आपल्या मागे राहावी यासाठी पंकजा यांचा प्रयत्न असल्यास चुकीचे काहीच नाही मात्र त्यासाठी त्यांनी जो मार्ग निवडला आहे तो कदाचित चुकीचा असू शकतो.
कोणी काहीही म्हणो भगवान गडावरून एकदा आदेश मिळाला की मग समाज कोणाचेच ऐकत नाही हे सर्वच राजकीय पक्षांना चांगलेच माहित आहे. त्यामुळे गडावर दसरा मेळावा होणारच आणि तेथे आपण भाषण करणारच असा जर पंकजा यांचा आग्रह असेल तर त्यात त्यांचा काही दोष नाही असेच म्हणावे लागेल मात्र त्यासाठी थेट नामदेव शास्त्री सानप यांना आव्हान देणे पंकजा यांना निश्चितच न परवडणारे आहे. कारण गड की पंकजा असा निवाडा करावयाचा झाल्यास समाज गडाच्या पाठीशी राहील यात शंका नाही. त्यामुळे पंकजा यांना सध्यातरी शांतपणेच निर्णय घ्यावा लागेल.
निवडणुकांना अद्याप साडेतीन वर्षाचा कालावधी असला तरी पंकजा यांची घाई त्यांच्या पुढील राजकारणाला मारक ठरू शकते असे राजकीय धुरीणांचे मत आहे. पंकजा यांनी गड आपल्याला सर्वोच्च आहे, त्याचे कोणी राजकारण करू नये अशीच भूमिका घेणे क्रमप्राप्त आहे असे अनेकांचे मत आहे, मात्र पंकजा यांचा एकंदर कारभार आणि राजकारण करण्याची पद्धत पाहता त्या असे वागतील याबाबत अनेकांना शंका आहे. त्यामुळे आगामी काळात गड (शास्त्री)विरुद्ध पंकजा असा संघर्ष अटळ असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे.
लक्ष्मीकांत रुईकर,बीड
9422744404