सचिन तायडे, पब्लिक स्पिकर, sachingtayade@gmail.com


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर येऊन आता दशक होत आहे. सुरूवातीला जो करिश्मा लोकांना वाटत होता तो कमी होताना दिसत आहे.  राज ठाकरेंनी आपले चाणक्य बदलायला हवेत मग त्यांचे भविष्य नक्की बदलेल, असे वाटते. 



जगातला पहिला राजकारणी


टॉलस्टॉय म्हणायचा की, “या जगात सर्वप्रथम ज्या व्यक्तीनं जमिनीवर कुंपण घालून जाहीर करून टाकलं होतं, की आजपासून ही जागा माझीच आहे…” तीच अशी ही व्यक्ती, जगातली पहिली राजकारणी होय... याच अनुषंगाने, हे खरंय की राजकारणात कुठल्याही नेत्याला स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व जाहीर करावंच लागतं, मात्र त्यासाठी जाहीर केलेले कोणतेही मुद्दे प्रभावी पद्धतीनं राबवणं हे देखील त्या नेत्याला तितकंच अपरिहार्य ठरतं. कुठलीही संस्था, कोणतीही संघटना ही माणसांमुळेच असते हा जगाचा इतिहास होता आणि आहे. तसेच हेही लक्षात ठेवलच पाहिजे की, त्याच संस्था, त्याच संघटना भरभराटीकडे जात असतात जिथं माणसाला महत्व आहे आणि जिथं त्यांच्यासाठी वेळही आहे.
 


“ जंगल में सबसे पहेले सीधे पेड काटे जाते है ”


हे चाणक्य यांचं एक जबदस्त विधान. मुळात, त्यांनी स्वतः उच्चारायलाही आता शेकडो वर्ष झाली आहेत, मात्र आजही या वाक्याचं महत्व कायम आहे...राजकारणात फार सरळ राहून जमत नाही, असं सत्य दर्शविणारं हे वाक्य अनेकांनी जीवनात अवलंबलय आणि या विचाराचे फायदेही उचललेत. चाणक्य हा त्याच्या काळातला एक मोठा राजकीय विश्लेषक. त्याचे कित्येक सल्ले हे त्या काळाला वळण देणारेही ठरले आहेत. राजकारणात अशा चाणक्यांची नेहमीच गरज असते. अशा चाणक्यांचं मार्गदर्शन जर समाजाचा नीट अभ्यास करून, सतत लोकांत राहून, आलेल्या अनुभवातून केलेलं असेल तर उत्तमच, मात्र याउलट केवळ चार पाच वृत्तपत्र वाचून नि पाच सात न्यूज चॅनल पाहून जर का अशा चाणक्यांनी त्यांची चाणक्य नीती नेत्याला दिली की मग कधी कधी त्या नेत्याचं होत्याचं नव्हतं होऊन जातं.
 


परिस्थिती नेत्याला जन्माला घालत असते


 फासे फिरले, गणितं चुकली की मग, राज्य ताब्यात मागणाऱ्याला लोकं एक अख्खा जिल्हाही ताब्यात देत नाहीत, हा अनुभव आहे. खरं तर,  नेत्याने गोळा करून ठेवलेल्या अशा चाणक्यांनी ( थींक टँक ) नेत्याला समाजाचं वातावरण नीट रित्या समजवून सतत सांगणं आवश्यक असतं.. कारण नेता यांच्या माहितीवरूनच बरच काही ठरवत असतो. मात्र कधी कधी अशा बिचा-या घरगुती चाणक्यांचीही इथं पूर्ण चूक नसते, तो नेताही दूरदृष्टीचा असावा लागतो. निव्वळ बोलता येतं म्हणून लोकांना जवळ ओढता येत नसतं. त्यांची नस सुद्धा पकडता आली पाहिजे, मग कुठे भविष्यावर आपली मोहर उमटवता येते. नक्कल करून फार फार तर लोकांचं मनोरंजन होतं, लोकं टाळ्याही देतात, पण राज्य ताब्यात देत नाहीत. मला काय वाटतं, यापेक्षा लोकांना काय वाटतं हे समजून घेणं अधिक गरजेचंय. खरंतर यालाच नस पकडणं म्हणतात, नेत्याचं कौशल्य यातच असतं की त्यानं त्याचा विचार लोकांच्या आवडी निवडीत बरोबर फीट बसवून द्यायचा असतो. मुळात मला नेता बनायचंय असं म्हणून जमत नाहीच. समाजाची परिस्थिती आणि त्या समाजाची गरजच कुठल्याही नेतृत्वाला जन्माला घालत असते. बॅनरवर झळकण्यापेक्षा लोकांच्या मनात प्रतिमा निर्माण करणा-यालाच  दुनिया नेता म्हणत असते.
 


मराठी माणूस


राजसाहेब, मराठी माणसाबद्दलची तुमची तळमळ खरी आहे यात दुमत नाही, तुम्ही राजकीय पटलावर आलात तेव्हा राज्यातल्या हजारो तरूणांना तुम्ही हिरो वाटला होता यातही दुमत नाही. कित्येक जेष्ठ पत्रकारांनी  तर तुम्हालाच महाराष्ट्राचं उज्वल भविष्य म्हणून जाहीरही करून टाकलं होतं.. हे एकीकडं सारं खरं असतांना, मधल्या कालावधीत काय बिघडलय याचा तुम्ही शोध घेतला पाहीजे साहेब… आज महाराष्ट्रात, कालपर्यंत तुमच्या नावाच्या शपथा खाणारे अनेकजण तुम्हाला दणादाण सोडून चाललेत हे कशाचं द्योतक मानायचं आम्ही? मराठी दलितांवरील अत्याचार तुमच्या थिंक टँकला दिसत नाहीत का? सध्या राज्यभर दुष्काळानं हाहाकार माजलाय तो तुमच्या थिंक टँकला दिसला नाही का? अख्खा मराठवाडा तर पार सुकून गेलाय साहेब. इथं राहणारी ही सारीच माणसं मराठीच आहेत साहेब, या मराठी माणसाला सुद्धा प्यायला पाणी लागतं इथल्या मराठी माणसाची जनावरंही सुद्धा पाणीच पितात, इथली शेती सुद्धा पाण्यावरच चालते साहेब…थोडक्यात काय तर हे असे कितीतरी अस्सल मुद्दे उचलून तुम्ही सरकारला सळो की पळो करायला पाहिजे होतं.. मात्र ते तसं अद्याप होऊ शकलं नाही…याची खंत थिंक टँकला बोचत नसेल मात्र खाली काम करणा-या सामान्य कार्यकर्त्याला सतत बोचत राहते कारण त्याला विचारणारे चार जण असतात साहेब.
 


अखंड महाराष्ट्र टिकला पाहिजे


अखंड महाराष्ट्र टिकलाच पाहिजे मात्र आहे त्या महाराष्ट्रातले मराठीजण टिकण्यासाठीचा राज्यव्यापी कार्यक्रम कुठेए साहेब? दाखले देतांना, दाक्षिणात्य नेते किती कडवट आणि त्यांचे कार्यकर्ते तर त्याहून महाकडवट असं पुन्हा पुन्हा सांगून आपल्यात कडवटपणा निर्माण होणार नाही साहेब. मान, सन्मान वा प्रेम मागून, सांगून वा कुणाला प्रशिक्षण देउन कधीच मिळवून घेता येत नसतो. एखादा लोकनेता मरतो तर त्याच्या अंत्ययात्रेला लाखो लोक कामधंदे सोडून डोळ्यात अश्रू घेऊन तिथं उपस्थित होतात, अशा वेळी गाड्या लावायची गरज नसते ना पाचशे रुपयांची नोट कोणी कुणाला देत नसतं, कारण ही माणसं आपले कामधंदे बंद करून त्या अंत्ययात्रेत सामील होतात. कारण मुळात त्यांच्या हाताला हे काम कदाचित त्या नेत्यामुळेच कधीकाळी मिळालेले असतं. तिथे  आलेल्या कित्येकांच्या हातात कधीना कधी त्या नेत्याचा तो आश्वासक हात यांच्या हातात पडलेला असतो.
 
लोकांना रफ अटीट्यूड देऊन आपण किती कडक आहोत हे दिखावा म्हणून ठिक मात्र तो तसा रक्तात असला पाहीजे, मुळात जनमानसात हा असा आपला दबदबा, स्वतःचा आवाज वेडावाकडा करून वा अरेतूरेची भाषा वापरून निर्माण करता येत नसतो तर तो आपल्या कृतीतून  निर्माण करावा लागत असतो. मुळात दबदबा वेगळा आणि गुंडागर्दी वेगळी हेही लक्षात घेतलं पाहिजे कधीकधी. सलग कृतीची जोड मागं वापरलेल्या सलग विधानांना असेल तर आपोआप धाक निर्माण होत जातो. नाही तर रस्त्यावरचं शेंबडं पोरगं सुद्धा, तुमच्या नेत्याचं काय चुकलं हे सांगायला मागं पुढं पाहत नाही मग एखाद्या पत्रकाराने वापरलेला, “तुम्ही अशी पलटी का मारली” हे असं विधान त्या नेत्याचा दबदबा संपत चाललाय हे उघड करायला पुरेसं ठरतं
 


तुम्ही ओरिजनलच रहा


अशात राजसाहेब तुम्ही विधान केलत, मला ओरिजनल राज ठाकरे आठवायला लावू नका… या विधानाचा काय अर्थ लावायचा साहेब? तुमचं रोज जे चालतं मग ते ओरिजनल नसतं का? साहेब, तुम्ही फक्त काम करा, तळमळीनं काम करा. काम करतांना कुणाचीही लाट येऊ द्या आपण फोकस राहिलं पाहीजे. खरंतर, कोणत्याही लाटेचा दिर्घकाळ प्रभाव राहत नसतो... मुळात लाट जाण्यासाठीच तर आलेली असते..शेवटपर्यंत टिकतं ते केलेलं कार्यच. त्यातल्या त्यात अशावेळी हे लक्षात ठेवणं अधिक गरजेचय, की कोणतीही राजकीय लाट कुणाच्या बाजूची कधीच नसते तर कुणाच्या विरोधात. मुळात या सा-यासाठी पहिले त्या मुंबईच्या बाहेर पडा साहेब…बघा याचा फायदा मुंबई महानगरपालिकेसाठी तर तुम्हाला होईलच शिवाय तुमचा जुना चाहता वर्ग तुम्हाला पुन्हा नव्याने डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही…



(सूचना : लेख हे कॉ़र्पोरेट ट्रेनर आणि पब्लिक स्पिकर असून लेखातील सर्व मुद्दे हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. त्याच्या सर्व मुद्यांशी 24taas.com सहमत आहे, असे नाही.)