ऋषी श्रीकांत देसाई /


आज सकाळी रिमा लागू यांचे निधन झाले. हल्ली अशा अनपेक्षित बातम्यांनीच सकाळ उजाडते. आपलं कुणीही नसताना कुणी तरी आपले गेलंय याची तीव्र वेदना सारखी बोचत राहते. सकाळपासून खूप साऱ्या पोस्ट पडतायत, सलमानची आई गेली, रेणुका शहाणेची आई गेली, शाहरुखची आई गेली.. आई या शब्दाला बॉलीवूडला ग्लॅमरस बनवण्यात रिमा लागू यांचा फार मोठा वाटा होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निरुपमा रॉय, दीना पाठक, नूतन, राखी अशा मात्तबर आईच्या भूमिकेत प्रत्येकांनी आपआपल्या प्राण ओतले पण रिमा लागू यांच्या निमित्ताने बंगल्यातील आई पण तेवढीच मायाळू असते याचा प्रत्यय आला.


रिमाताईंच्या चित्रपट नाटकाची यादी इथे मांडत नाही पण सिंहासनमधील छोटासा रोल, तू तू मै मै या सिरियलची सासू आणि सविता दामोदर  परांजपे या नाटकातील त्यांचा अभिनय विसरणे अशक्य.. 


अगदी कालचीच एक गोष्ट, कालच मी त्यांची नामकरण सिरियलमधील काम पाहत होते. नामकरण ही पूर्ण सिरियल रिमा लागूंच्या खल अभिण्यासाठीच प्रसिद्ध होती.. त्यात चीड येण्याइतपत त्यांनी काम केले होते.. मुद्दाम नामकरणमधील रिमा ताईंचे काम पाहा. अंगावर काटा, डोळ्यात संताप, डोक्यात कट अशी शब्दात न मांडणारी त्यांनी भूमिका सकरलीय. अगदी मी काल पहिलेल्या एपिसोडमध्ये त्यांना जबरदस्तीने अॅडमिट केलंय. त्यावेळेचे कौर्य आणि संताप केवळ शब्दातीत.


कालच्या भागात त्यांना झोपेचे इंजेक्शन देऊन झोपवतात असा सिन होता.. कदाचित सोयीस्कर उपाय म्हणून कुणीतरी वेगळी कलाकार रिप्लेस येईल पण मेकअप न करता , भुवया न उडवता, आवाज न चढवता ही खलनायिका म्हणून दुसरी रिमा लागू मिळणे अशक्य !! 


ती देखण्या हिरो, हिरॉइनची आई होती हे गुडी गुडी झाले पण मला ती आई म्हणून आवडली ती केवळ वास्तवमध्ये.. रघुनाथ नामदेव शिवलकरची आई साकारताना मराठी करारीपणा मूर्तिमंत उतरला होता. स्वतःच्या पोरासाठी काळीज तुटत असताना पोटच्या पोराला "इसे बोलते है घोडा" ही पोराची शिकवण ऐकत त्याला "ए माँ मुक्ती दिला दे ना" म्हणत गोळ्या झाडताना वास्तवचा पूर्णविराम झाला आणि पुन्हा रघू घडू नये म्हणून जगलेली आई दिसली.. रीमा लागू हे नाव आज काळाच्या पडदयाआड गेलंय.


आज रघुनाथ आपल्या आईला आणि अवनी आपल्या आजीला शोधत नक्की दार ठोठावत म्हणेल ' ए माँ दरवाजा खोल ना, माँ' 


भावपूर्ण श्रद्धांजली