Twit ने कमाल केली, Twitter न वापरणाऱ्या सर्वसामान्यांचे काय ?
सोशल मीडियाबाबत या माध्यमाचा चांगलाच उपयोग होतो, केला जात आहे आणि त्याचा सर्वसामान्यांनाही फायदा होतो. पण...
अमित जोशी, झी 24 तास : सोशल मीडियाबाबत राजकारणी भलतेच सावधगिरी बाळगतात, एका अर्थाने ते सत्यही आहे. कारण सोशल मीडियावर एखाद्या गोष्टीने राजकारणी लोकांचे होत्याचे नव्हते होऊ शकते. पण या माध्यमाचा काही राजकारणी खुबीने वापर करतात. अनेक जणांचा यामध्ये स्वार्थ असला तरी यामुळे व्यवस्थेवर / प्रशासनावर वचक ठेवण्यासाठी, समाजातील घडामोडींबाबत स्थिती समजून घेण्यासाठी, वास्तव जाणून घेण्यासाठी या माध्यमाचा चांगलाच उपयोग होतो, केला जात आहे आणि त्याचा सर्वसामान्यांनाही फायदा होतो.
असाच अनुभव रेल्वेच्या twitter बाबतीत मला आला आणि काही प्रश्नही मनात निर्माण झाले.
झाले असे की, मंगळवारी पत्रकारितेमधील माझी सहकारी कपालिनी सिनकर हिचा अगदी सकाळी 6.45 च्या सुमारास फोन आला. तिची आई कोकणकन्यामधून प्रवास करत होती आणि तिची रत्नागिरी जवळ येताच पर्स चोरट्यांनी मारली आणि ते अर्थात पसार झाले. तिची आई घाबरली होती. कारण पैसे, तिकीट आणि मुख्य म्हणजे काही दागिने चोरीला गेले होते. या धक्क्यामुळे ती रडत होती, घाबरली होती. कपालिनी म्हणाली, पर्स गेल्याचं टेंन्शन नाही तर त्या पर्समध्ये आईच्या ब्लडप्रेशरची औषधे होती. आईची स्थिती लक्षात घेता ही औषधे जवळ असणे आवश्यक होते. आता औषधे नसल्याने घाबरलेल्या आईला काही झाले तर काय करायचे, असा कपालिनी पुढे प्रश्न होता, आईची काळजी होती, कारण ती एकट्याने प्रवास करत होती, चटकन काळजी घेणारे कोणी जवळ नव्हते.
तेव्हा मी आईबद्दलची, ती कोणत्या डब्यातून प्रवास करते वगैरे माहिती कपालिनीकडून घेतली आणि सुरेश प्रभूंसह कोकण रेल्वेला Twit केले आणि मदतीसाठी विचारणा केली. दोन मिनिटांनी मनात म्हटले की एवढ्या सकाळी कोण Twit बघत असेल का, तेव्हा कोकण रेल्वेच्या control रूमला फोन केला. माझे नाव सांगत मराठीतून माहिती सांगायला सुरुवात केली असतांच समोरील व्यक्ती तात्काळ हिंदी मध्ये म्हणाली की तुमच्या twit ला आत्ताच reply दिला आहे. काळजी करू नका, TT - पोलीस त्यांच्यापर्यन्त पोहोचतील. या एवढ्या पटकन reply ने, प्रतिसादाने मी उडालोच.
ट्रेनने रत्नागिरी सोडले असल्याने आणि पुढे बोगदे असल्याने कोकण रेल्वेच्या कंट्रोल रूमला गाडीपर्यन्त माहिती द्यायला काही वेळ गेला खरा पण खरोखर अर्ध्या तासांत TT, RPF कपालिनीच्या आई पर्यन्त पोहोचले, त्यांना धीर दिला, चहा दिला, तिकीट गेले असले तरी स्टेशन बाहेरपड़े पर्यन्त त्रास होणार नाही याची व्यवस्था केली. थोडक्यात कपालिनीच्या मनातील भितीला व्यवस्था धावून आली आणि संकट दूर केले.
हे सर्व अर्थात twitter ने झाले यात शंका नाही आणि याला सोशल मीडियाचा खरोखर चांगल्या अर्थाने वापरु करणा-या रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे योगदान आहे, ते त्यामागे आहेत. पण यामुळे काही मुद्दे मांडावासे वाटतात...
रेल्वेची मरगळ झटकण्यात आणि त्यांना कामाला लावण्यात रेल्वेमंत्री सुरेश प्रभूच जवाबदार आहेत. त्यांनी सोशल मीडियाचा खुबीने वापर करत रेल्वेच्या सेवेचा दर्जा वाढवण्यात, उंचावण्यात सुरुवात केली आहे.
मात्र किती जण ट्विटर वापरतात हा खरा प्रश्न आहे. मी ट्वीटरचा वापर केला म्हणून मदत मिळवू शकलो. जे ट्विटर वगैरे वापरु शकत नाहीत त्यांचे काय?. कारण हे माध्यम अजुनही सामान्यांपासून कोसो दूर आहे. तसंच ट्विटरच्या माध्यमातून असे काही होऊ शकते याचा थांगपत्ताही नाही. अशा लोकांसाठी - प्रवाशांसाठी धावत्या ट्रेनमध्ये हाक मारल्यावर रेल्वेचे कर्मचारी अशी मदत करतील का, असा विश्वास आणि वातावरण रेल्वे कधी तयार करणार, रेल्वे याबाबात विचार का करत नाही.
आता मुळ मुद्दा चोरीचा. रेल्वेमधील प्रवास अजुनही सुरक्षित नाही, त्यावर रेल्वे कधी पावले उचलणार. चोरी झालेल्या पर्स किंवा वस्तू परत मिळवून देणार का, का ट्विटरवरुन मदत करतांना दाखवलेलेली तप्तरता या चोरीचा छडा लावण्यात दाखवणार का ?
असे अनेक प्रश्न उभे राहत आहेत. यावर रेल्वेमंत्र्यांनी लक्ष द्यावे, यासाठी आता ट्विटची किमान वाट पाहू नये. कारण हे सर्व आपल्याला माहितच आहे.