हेमंत महाजन, मुंबई : चिनी फटाक्यांवर बंदी आणूनही देशी फटाके बाजारपेठेस १००० कोटींचा तोटा झाला असल्याची माहिती अ‍ॅसोचेमने मागच्या वर्षी दिली. अ‍ॅसोचेमने सांगितले की, सरकारने बेकायदा फटाके उत्पादकांवर कारवाई केली असून चीनमधून येणाऱ्या फटाक्यांवरही बंदी घातली आहे, पण चीनमधून फटाके आयात सुरूच होते. त्यामुळे फटाके उद्योगाला फटका बसला. शिवकाशी आणि इतर १० महानगरात फटाक्यांचे किरकोळ व्यापारी आहेत त्यांच्याकडे चिनी फटाक्यांचे साठे होते. ते बेकायदेशीररीत्या विकत होते, त्यात अहमदाबाद, दिल्ली, जयपूर, लखनऊ आणि मुंबई यांचा समावेश आहे. फटाक्यांची मागणी ३५-४० टक्के घटली असून १००० कोटींचा तोटा झाला. त्याचे कारण चिनी फटाके आहे असे अ‍ॅसोचेमचे सरचिटणीस डी.एस.रावत यांनी सांगितले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर भारतात चिनी फटाके आल्याने देशी फटाक्यांना मागणी नव्हती. उत्पादन किंमत वाढल्याने भारतीय फटाके महाग होते. यंदाही चिनी वस्तूंनी दिवाळीची बाजारपेठ काबीज केली आहे. अनेक चिनी बनावटीच्या शोभेच्या वस्तू बाजारात दाखल झाल्या आहेत. त्यात आकाशकंदील, पणत्या, विद्युत रोषणाईचे दिवे आणि इतर सुशोभीकरणाच्या वस्तूंचा समावेश आहे. पालिकेच्या महिला आणि बालकल्याण समितिच्या वतीने स्वयंमहिला उद्योजक, बचत गट आणि इतर संस्थांच्या मदतीने या बाजारपेठा भरविल्या आहेत पण त्यांना चिनी वस्तूंशी स्पर्धा करणे अशक्य आहे.


गेल्या दोन दशकांपासून चिनी घुसखोरी ही फक्त सीमेपुरतीच मर्यादीत नाही तर त्यांनी भारतीय बाजारपेठाही काबीज करायाला सुरूवात केली. सणातील फटाक्यांची मागणी लक्षात घेऊन चिनी फटाके भारतीय बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी दाखल झाले आहेत. भारतीय फटाक्यांच्या तुलनेत चिनी फटाके सुरक्षिततेच्या तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक धोकादायक आहेत. त्यामुळे हे फटाके आपण टाळावेत. समुद्रमार्गे बेकायदेशीररीत्या आयात होणाऱ्या या फटाक्‍यांमुळे फटाका उद्योग धोक्‍यात आ्ला आहे.


भारतीय फटाक्यांनी जागतिक उत्पादनांशी स्पर्धा करावी


आपले फटाके गुणवत्ता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने चिनी फटाक्यांपेक्षा निश्चित चांगले आहेत. चिनी फटाक्यांमध्ये क्लोरेट आणि पर-क्लोरेटचा या विषारी केमिकलचा वापर करण्यात येतो. एकूणच चिनी फटाके बनवताना हलक्या प्रतीचा आणि हानिकारक कच्चा माल वापरला जात असल्याने ते आपल्या फटाक्यांच्या तुलनेत स्वस्त आहेत. भारतात फटाक्‍यांची निर्मिती करताना पोटॅशिअम परक्‍लोरेटचा वापर करण्यावर बंदी आहे. या कायद्यात काळानुसार बदल होण्याची गरज आहे. जेणेकरून भारतीय फटाके जागतिक उत्पादनांशी स्पर्धा करू शकतील 


परदेशातून येणा-या कंटेनरची चौकशी करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे कस्टम विभागाचे रडगाणे असते. बहुतेक माल नेपाळमार्गे किंवा समुद्रमार्गे भारतात येतो .


सर्व वस्तूंमध्ये चीनी घुसखोरी


भारत हा सणांचा देश आहे. या वर्षी रक्षाबंधनाकरता ७५% राख्या चीनी बनावटीच्या होत्या. गणेशमूर्तीच्या बाजारपेठेत चीनने घुसखोरी पूर्वीच केलेली आहे. मोठ्या प्रमाणात साजऱ्या केल्या जाणाऱ्या उत्सवांना हेरून, आकाशकंदील, दिवे, विविध भेटवस्तूंनी भारतीय बाजारपेठ चीनने व्यापली आहे. मागच्या दिवाळीत चिनी विक्रेत्यांनी भारतीय बाजारपेठेत १८०० कोटी रुपयांचा नफा कमावला.


फराळाचे पदार्थ वगळता दिवाळीच्या सर्व वस्तूंमध्ये चीनने घुसखोरी केली आहे. चिनी आकाश कंदिलांनी बाजारपेठेवर कब्जा केला आहे. हे कंदील भारतीय कंदिलांच्या तुलनेत अतिशय स्वस्त असल्याने ग्राहकांचा ओढा त्यांच्याकडे असतो. चिनी तोरणांनी घर/बाजार सजतो. प्लॅस्टिकच्या दिव्यांच्या माळांना मोठी मागणी आहे. देशप्रेमी नागरिकांनो यावेळेस तरी देशी वस्तूच विकत घ्या.


आपले लहान, मध्यम उद्योग बरबाद  


चीनच्या `मेड इन चायना’ वस्तूंनी भारतात जम बसवला आहे. त्यांनी आतापर्यंत देशी बाजारपेठेतील २०-२५ टक्के वाटा पटकावला आहे. किंमती कमी असल्याने भारतीय विक्रेते व ग्राहकांची चिनी वस्तूंना पसंती लाभत आहे. भारतीय बाजारपेठेत मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून देवांच्या तसबीरी ते पूजेच्या साहित्यापर्यंत चीनची घुसखोरी आहे. आपली बाजारपेठ चिनी वस्तूंनी ओसंडून वाहते आहे. चीन खास भारताकरता वस्तू बनवून आपल्या लहान, मध्यम उद्योगांना पद्धतशीरपणे बरबाद करत आहे.


रंगीबेरंगी बाहुल्या, बॅटबॉल, चावीची खेळणी, टेडीबेअर या सगळ्या आपल्याकडच्या खेळण्यांमध्ये चीनने घुसखोरी करत वर्चस्व निर्माण केले आहे. त्यामुळे  भारतीय खेळण्यांची मागणी घटली आहे. खेळण्यांचे मार्केट ८० टक्के चिनी बनावटीच्या खेळण्यांनी भरले आहे. `सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्न्मेंट’ प्रमाणे चिनी बनावटीच्या ५७ टक्के खेळण्यांमध्ये प्रमाणाबाहेर विषारी रसायने आढळली होती. पालकांनी एकत्र येऊन या खेळण्यांवर बंदी घालण्यासाठी दबाव आणला पाहिजे.


बाय स्वदेशी


भारताचे याआधीचे `बाय चायनीज’ धोरण त्या देशाच्या पथ्यावरच पडत आहे. भारतातील वीज क्षेत्रातील कंपन्या चिनी उत्पादकानुसार बदल करीत आहेत आणि ते भारतीय उत्पादकांकडे दुर्लक्ष करीत आहेत. चिनी कंपन्यांसाठी भारत ही मोठी बाजारपेठ बनली आहे. स्वदेशीची भाषा नष्टच झाली आहे.


स्वदेशी मालच खरेदी करा. चिनी नको. जे आपल्या देशात चांगले पिकते / बनते, ते  खरेदी करू या. सरकारने चीनकडून आयात होणार्या राख्या, दिवाळीत येणारे आकाश कंदील, पणत्या, लाइटच्या शोभीवंत माळा, रंगपंचमीमध्ये येणाऱ्या पिचकाऱ्या पूर्णपणे थांबवल्या पाहिजे.


MADE IN CHINA वस्तू अजिबात खरेदी करू नका


चिनी वस्तू या लघु उद्योगांतून बनविल्या जातात. चिनी स्त्रिया या वस्तू घरी बनवतात. त्यामुळे त्यांची किंमत अत्यंत कमी आहे. आपल्या उद्योजकांची मानसिकताच बदलली आहे. चिनी वस्तू जर स्वस्तात मिळतात तर आपण त्या वस्तू कशाला बनवायच्या? या विचाराने आपण चिनी वस्तूंचे कंटेनरच्या कंटेनर खरेदी करतो वा स्मगल करतो, त्यावर आपले लेबल लावतो आणि बाजारात विकतो. त्यात भरपूर पैसे कमावतो. पण यामुळे आपण चिनी अर्थव्यवस्थेला हातभार लावतो आहोत. आपल्याकडे बेकारी वाढलेली आहे. सामाजिक सुरक्षितता धोक्यात येत आहे. चीनशी जर आपल्याला मुकाबला करावयाचा असेल तर आपणही त्यांच्याप्रमाण लघुउद्योग निर्माण करावयाला पाहिजे. त्यासाठी स्वस्तात जागा, भांडवल, कच्चा माल उपलब्ध करून दिले पाहिजे. कर कमी केले पाहिजेत. यामुळे आपणसुद्धा दर्जेदार वस्तू बनवू शकू. मागचे सरकार या बाबत पूर्णपणे निष्क्रिय होते. आता हा सर्व प्रकार रोखण्यासाठी सरकारनेच पुढाकार घेऊन, भारतीय लघुउद्योग उत्पादनाला चालना देण्याची गरज आहे.


आज चीन प्रचंड आर्थिक मंदीच्या सावटाखाली आहे. त्यामुळे चीनने त्यांच्या मुद्रेची किंमत 30% कमी केली आहे. जागतिक अर्थतज्ञांचे मत आहे की चीन स्वतःच्या उत्पादनांच्या किमती कमी करुण आर्थिक मंदीचा सामना करण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे भारतीय आणि इतर देशांच्या बाजारपेठेत चीनी उत्पादने अत्यंत कमी किमतीत उपलब्ध होतील. हिच खरी वेळ आहे चीनला आर्थिकदृष्टया झोपवण्याची. कारण चीनची जगातली सर्वात मोठी बाजार पेठ भारत देश आहे. तेव्हा सर्वांना विनंती आहे कि कोणतीही चीनी बनावटीची MADE IN CHINA वस्तू अजिबात खरेदी करू नका. तसेच व्यापारी मित्रांनी पण चीनी माल स्वस्त मिळतोय म्हणून मोठ्या प्रमाणावर खरेदी अथवा विक्री करू नका. कारण आपल्याला चीनला आणि पर्यायाने पाकिस्तानला नेस्तनाबूत करण्याची एक संधी आहे.