मुंबई : आले. मसाल्यामधील महत्वाचा घटक. सर्दी, खोकल्यावरील औषध. आल्यामध्ये अनेक पोषक तत्व असून ते आरोग्य वर्धक आहे. बायोएक्टिव युक्त आले असते. आल्याचे गुणधर्म आरोग्याला अधिक उपयुक्त आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. आले हे औषधी आहे. यातील  फेनोलिकमुळे अपचन तसेच जलन याला आराम मिळतो. पित्त होण्यापासून रोखले जाते. आले वेदनाशामक, तापमान कमी करणारे आहे. जिंगेरॉलपेक्षा झिंगेरॉन हे कमी वासाचे व गोडसर वासाचे आहे. आल्यामुळे तोंडात लाळेची निर्मिती जास्त प्रमाणात होते. त्यामुळे घास गिळायला सोपे जाते. 


२. आले पाचक, सारक व भूक वाढविणारे आहे.पित्ताने चक्कर आली वा मळमळत असेल, शस्त्रक्रियेनंतर उलटीसारखे वाटत असेल तर आल्याचा रस साखर व मिठाबरोबर घ्यावा. सर्दी व कफावर तुळशीच्या पानांबरोबर आल्याचा किस उकळून प्यावा. सांधेदुखीवर आल्याचा काढा देतात वा एरंडेल तेलाबरोबर सुंठीची चिमूट नियमाने घ्यावी. मधूमेहात मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले तर नियमितपणे आल्याचा रस घ्यावा. 


३. रक्तातील चरबीची पातळी कमी करण्यासाठी व रक्त पातळ करण्यासाठी आल्याचा उपयोग होता. ज्यांना पित्ताशयातील खडे त्रास देत असतील त्यांनी आले खाऊ नये. आल्यात मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह व झिंक(अल्प प्रमाणात) आहेत. क, ब३  व ब६ ही जीवनसत्वे आणि फार थोड्या प्रमाणात पिष्टमय पदार्थ आल्यात आहेत. वातहारकही असल्याने जेवणानंतर पोटात गॅस झाला तरी आल्याचे चाटण चाटावे. ते आतड्याची हालचाल वाढविते व पोटातील वेदना कमी करते


४. सर्दी खोकल्यावरील गुणकारी औषध म्हणून प्रचलित आहे. अतिसारावर आल्याच्या रसाचा बेंबीवर लेप करावा. आल्याचा रस व मध सम प्रमाणात बाटलीमध्ये साठवून दोन-दोन चमचे दोन वेळा घेतल्यास सर्दी, खोकला पडसे व स्वरभंग बरे होतात. अजीर्ण झाल्यास आल्याचे रसात लिंबाचा रस व मीठ घालून पाणी प्यावे. आले तोंडात ठेवताच लाळग्रंथी सक्रिय होतात. लाळ पाझरू लागते. आल्याचे सेवनाने पोटात गॅस तयार होत नाही. पोटदुखी व मळमळ थांबण्यास मदत होते.


५. आले व तुळशीचा काढा एकदम गुणकारी. सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखीवर हा काढा औषधी व रूचकर ठरतो. यात काळ्या तुळशीची पाने, सुंठ पावडर वा किसलेले आले, जेष्ठमध, भाजून कुटलेली अळशी (जवस) चहाच्या पातीचे तुकडे, घालून पाणी अर्धे आटेपर्यंत उकळावे. त्यात गुळ घालून, गाळून हा काढा प्यायला द्यावा. छातीत कफ असल्यास लोखंडाच्या पळीत टाकणाखार गरम करावा व ती लाही पिण्यापूर्वी मिसळावी.