नवी दिल्ली : पाकिस्तानच्या गुप्तचर विभागाने भारताला पहिल्यांदाच सुरक्षाविषयक माहिती पुरवली आहे. भारतात महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर गुजरात राज्यात लष्कर-ए-तोयबाचे दहा दहशतवादी शिरले असून ते मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पाकिस्तानने भारताला दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नासिर खान जंजुआ यांनी ही माहिती भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांना दिली आहे. यामुळे शनिवारपासून गुजरातमध्ये हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तसेच संपूर्ण राज्यातील सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे. रविवारी सकाळी राष्ट्रीय सुरक्षा पथकाच्या (एनएसजी)च्या दोन तुकड्यांनाही पाचारण करण्यात आलंय.


सोमनाथ, अक्षरधाम, द्वारका यांसरख्या पर्यटन स्थळांच्या तसेच, वीजनिर्मिती केंद्रे आणि सरदार सरोवर सारख्या महत्त्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. शनिवारी गुजरातमधील सर क्रीक परिसरात पाच पाकिस्तानी होड्या आढळून आल्या होत्या ज्यात कोणीही व्यक्ती नव्हती. यानंतर पाकिस्तानकडून हा इशारा देण्यात आला आहे. 


सोमवारी होणाऱ्या महाशिवरात्रीला आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा या दहशतवाद्यांचा इरादा असल्याचे समजते आहे. यानंतर गुजरातमधील सर्व पोलिसांच्या सुट्याही रद्द करण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईतही सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.