मुंबई : भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती. १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी डॉ. आंबेडकरांचा जन्म झाला. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केलं. समाजातील जातीभेदाचे उच्चाटन करुन त्यांनी सामाजिक न्याय प्रस्थापित केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तळागाळातील लोकांना बौद्धिक आणि सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करुन समानतेचा मंत्र देणारे दीपस्तंभ म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर... गरीबी, निरक्षरता ही गुलामगिरीची मूळ कारणं असल्यानं 'शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा' असा मंत्र त्यांनी दिला. देशाची घटना लिहून त्यांनी प्रत्येकाला मतदानाचा हक्क मिळवून दिला. पाच हजार वर्षांपासून अमानुष, लाचारीचे जीवन जगणाऱ्या जनमानसात आत्मसन्मानाची आणि अस्मितेची ज्योत पेटवणाऱ्या महामानवाला 'झी २४ तास'चाही सलाम... 


याच निमित्तानं ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय...


डॉ. आंबेडकर जयंती संयुक्त राष्ट्र संघातही साजरी करण्यात आलीय. १५६ देशांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही जयंती साजरी झाली. कमानी ट्यूबज उद्योग समूहाच्या अध्यक्षा कल्पना सरोज यांच्या कल्पनेतून हा योग जुळून आला. अशाप्रकारे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती संयुक्त राष्ट्र साजरी व्हावी अशी सरोज यांची इच्छा होती.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं या महामानवाला अभिवादन करण्यात येतंय. दादरच्या चैत्यभूमीवर आंबेडकर जयंतीनिमित्त आकर्षक रोषणाई करण्यात आलीय. 


तर यानिमित्तानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. पुण्यामध्ये संघाच्या कसबा भागात स्वयंसेवकांचं संचलन होतंय तर पर्वती भागातर्फे बाबासाहेबांना घोषाची मानवंदना देण्यात येतेय. बिबवेवाडीतील डॉ. आंबेडकर उद्यानात हा कार्यक्रम होतोय. या घोष वादनानं जयंतीचं वातावरण प्रफुल्लीत झालं.


दरम्यान, मुंबईत सामाजिक न्याय विभागाच्यावतीनं मुंबईत 'भिम पहाट' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी, जेष्ठ गायक सुरेश वाडकर,नंदेश उमप, वैशाली माड़े, जयवंत भालेकर यांनी भीमगीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं.