यावेळी नोकरदारांना 13 टक्के वेतनवाढ शक्य
कर्मचारी भरती सल्लागार कंपनी टीमलीजने वर्तवलेल्या शक्यतेनुसार, देशातील कर्मचाऱ्यांना चालू आर्थिक वर्षात सरासरी 11 ते 13 टक्क्यांची वेतनावाढ मिळण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : कर्मचारी भरती सल्लागार कंपनी टीमलीजने वर्तवलेल्या शक्यतेनुसार, देशातील कर्मचाऱ्यांना चालू आर्थिक वर्षात सरासरी 11 ते 13 टक्क्यांची वेतनावाढ मिळण्याची शक्यता आहे. एवढंच नाही तर भारतीय कंपन्यांमार्फत यंदा आणखी जास्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती होण्याची शक्यता वाढली आहे.
कर्मचारी भरती सल्लागार कंपनीच्या अहवालानुसार, भारतीय रोजगार क्षेत्रात परिपक्वतेची लक्षणे दिसून येत आहेत आणि विविध मार्गांनी गुणवत्तेचा गौरव केला जात आहे. तरी, यंदा केवळ 42 टक्के कर्मचाऱ्यांना वेतनात भरघोस वाढ मिळण्याची शक्यता आहे. मात्र, कर्मचाऱ्याच्या सरासरी वेतनात 11 ते 13 टक्के वाढीचा अंदाज आहे.
तसेच, दिल्ली, मुंबई, पुणे, मुंबई, हैदराबाद आणि चेन्नईतील कर्मचाऱ्यांना जास्त प्रमाणात वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय, विशेष कौशल्य टिकवून ठेवण्यासाठी काही 'ब्लू कॉलर' नोकऱ्यांच्या वेतनात भरघोस वाढीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
माहिती आणि तंत्रज्ञान, अॅग्रिकल्चर अँड अॅग्रोकेमिकल्स, एफएमसीडी, हेल्थकेअर आणि फार्मा, हॉस्पिटॅलिटी, रिटेल आणि टेलिकम्युनिकेशन्स क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सरासरी 11 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.