शाळेजवळ कंटेनरमधून गॅसगळती... 300 लहानग्यांना बाधा!
दिल्लीच्या तुगलकाबादाजवळ एका शाळेत शनिवारी सकाळी झालेल्या गॅस गळतीमुळे 300 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं.
नवी दिल्ली : दिल्लीच्या तुगलकाबादाजवळ एका शाळेत शनिवारी सकाळी झालेल्या गॅस गळतीमुळे 300 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं.
मिळालेल्या माहितीनुसार, तुगलकाबाद डेपोमध्ये उभ्या असलेल्या एका कंटेनरमधून मध्यरात्री ३.०० वाजल्या पासून गॅस गळती सुरू होती. या विषारी गॅसमुळे रानी झाँसी कन्या सर्वोद्य विद्यालयाच्या अनेक विद्यार्थ्यांना बाधा झालीय. दीडशेहून अधिक लहानग्यांच्या जीवाला या गॅसमुळे धोका निर्माण झाला. सध्या सर्व मुलांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येतंय.
बेशुद्ध अवस्थेत या विद्यार्थ्याना रुग्णालयात दाखल करावं लागलं. घटनास्थळी एनडीआरआफ, पोलीस आणि बचावकार्ये पोहचले. उपराज्यपालांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश देत तत्काळ यासंबंधी अहवाल मागितला आहे. उल्लेखनीय म्हणजे, डेपोमध्ये केमिकल चीनमधून आलं होतं, अशी माहिती मिळतेय.