अॅक्सिस बँकेत 44 बनावट खात्यात 100 कोटी रुपये
नोटाबंदीनंतर काळा पैसा पांढरा करण्यासाठी अनेकांनी चक्क बनावट नावाने बॅंक खाते काढलीत. चक्क अॅक्सिस बँकेत 44 बनावट खात्यात 100 कोटी जमा झाल्याचे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा मारल्यानंतर ही बाब उघड झाली.
नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर काळा पैसा पांढरा करण्यासाठी अनेकांनी चक्क बनावट नावाने बॅंक खाते काढलीत. चक्क अॅक्सिस बँकेत 44 बनावट खात्यात 100 कोटी जमा झाल्याचे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा मारल्यानंतर ही बाब उघड झाली.
दिल्लीच्या चांदनी चौकमधील अॅक्सिस बँकेच्या शाखेवर हा छापा मारण्यात आला. या खात्यांमध्ये 8 नोव्हेंबरपासून चलनातून बाद झालेल्या जुन्या नोटांमध्ये 100 कोटी रुपये जमा करण्यात आले होते.
नोटबंदी जाहीर झाल्याच्या दिवसापासून अॅक्सिस बँकेच्या दिल्लीतील या शाखेमध्ये 450 कोटी रुपये जमा झाले होते. बनावट कागदपत्रे वापरुन ही बनावट खाती तयार करण्यात आली होती. सोने खरेदीसाठी या रक्कमेचा वापर केला जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.
अॅक्सिस बँकेच्या दिल्लीतील शाखेवर मारण्यात आलेला हा दुसरा छापा आहे. मागच्या महिन्यात दिल्लीतील काश्मीरा गेट येथील अॅक्सिस बँकेच्या शाखेतून नव्या चलनातील 3.5 कोटी रुपयांच्या नोटांसह दोघांना अटक केली होती.