24 नोव्हेंबरपर्यंत 500, 1000च्या जुन्या नोटा वापरता येणार
नोटेवरील बंदीबाबत सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी. सरकारी रुग्णालयं, टोलनाके, पेट्रोलपंप याठिकाणी 500 आणि 1000च्या जुन्या नोटा आता 24 नोव्हेंबरपर्यंत घेण्यात येणार आहेत.
नवी दिल्ली : नोटेवरील बंदीबाबत सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी. सरकारी रुग्णालयं, टोलनाके, पेट्रोलपंप याठिकाणी 500 आणि 1000च्या जुन्या नोटा आता 24 नोव्हेंबरपर्यंत घेण्यात येणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मध्यरात्री घेतलेल्या एका उच्च स्तरीय बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय. शिवाय अर्थ मंत्रालयानं बँकेतून रक्कम काढण्याची मर्यादा वाढवलीये.
आता नागरिकांना आठवड्याला 24 हजार रुपये काढता येणार आहेत. तसंच आता एटीएममधून नागरिकांना दिवसाला अडीच हजार रुपये काढता येणार आहेत. बँकेतून बदलून मिळणा-या रकमेतही वाढ करण्यात आली आहे. चार हजार रुपयांऐवजी साडेचार हजार रुपयांच्या चलनी नोटा प्रत्येकाला बँकेतून बदलून मिळणार आहेत.
अर्थ मंत्रालयानं तसे आदेश सर्व बँकांना दिले आहेत. शिवाय दिव्यांग आणि वृद्ध नागरिकांसाठी बँकेत वेगळी व्यवस्था करण्याचे निर्देशही देण्यात आलेत. तसंच पेन्शन धारकांनाही दिलासा मिळालाय.
पेन्शनधारकांना त्यांचा हयातीचा दाखला सादर करण्यासाठी 15 जानेवारी 2017 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलीय. हे दाखले नोव्हेंबरपर्यंत सादर करावे लागत होते. मात्र त्यालाही आता दोन महिन्यांची मुदतवाढ दिली गेलीय.