जयपूर : भाजपचं शासन असलेल्या राजस्थानमध्ये 500 गायींचा मृत्यू झाल्यानं राजस्थानच्या वसुंधरा राजे सरकारवर जोरदार टीका होत आहे. जयपूरमधल्या गोशाळेमध्ये गेल्या दोन आठवड्यामध्ये 500 गायी दगावल्या आहेत. मुख्यमंत्री वसुंधरा राजे या गोशाळेला जाऊन भेट देणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या गोशाळेमध्ये असलेले 250 कर्मचारी मागच्या एका महिन्यापासून संपावर गेले आहेत. जयपूर महापालिका आणि हे कर्मचारी पुरवणाऱ्या कंपनीमध्ये सुरु असलेल्या वादामुळे कर्मचाऱ्यांचा पगार झाला नाही, यामुळे कर्मचारी संपावर गेले आहेत. 


जयपूरमध्ये असलेल्या या गोशाळेमध्ये एकूण आठ हजार गायी आहेत. कर्मचारी संपावर गेल्यामुळे या गायींना अन्न मिळत नाही. या गायींचं शेण उचालायलाही कर्मचारी नाही, त्यातच पावसामुळे गोशाळेमध्ये मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे. 


मागच्या दोन दिवसांमध्ये आम्ही 90 मृत गायी गोशाळेतून घेऊन गेलो, तिकडे आणखी काही मृत गायी आहेत, अशी प्रतिक्रिया गोशाळेची देखभाल करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांनी दिली आहे. 


काँग्रेसनं मात्र या मुद्द्यावरून भाजपला लक्ष्य केलं आहे. एवढ्या गायी मरत असताना आता गोरक्षक कुठे गेले, असा सवाल काँग्रेसनं विचाराला आहे. तर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानंही वसुंधरा राजे सरकारवर टीका केली आहे.