आधार कार्ड विधेयक लोकसभेमध्ये पास
आधार कार्ड विधेयक 2016 लोकसभेमध्ये पास करण्यात आलं आहे.
नवी दिल्ली: आधार कार्ड विधेयक 2016 लोकसभेमध्ये पास करण्यात आलं आहे. नागरिकांना सरकारची सबसिडी देण्याच्या उद्दीष्टानं हे विधेयक पास करण्यात आल्याची प्रतिक्रिया अर्थमंत्री अरुण जेटलींनी दिली आहे.
वैयक्तिक आयुष्याच्या अधिकारावर या विधेयकामुळे घाला येईल असा आरोप करत, हे विधेयक स्टँडिंग कमिटीकडे पाठवा, अशी मागणी बीजेडीनं केली, ज्याला काँग्रेस आणि एआयएडीएमकेनं पाठिंबा दिला. पण विरोधकांची ही मागणी सरकारनं फेटाळली, आणि बहुमताच्या जोरावर हे विधेयक लोकसभेत पास झालं.
एलपीजी सिलेंडरची सबसिडी आधार कार्डामार्फत देण्यात आल्यामुळे सरकारचे 15 हजार कोटी रुपये वाचले असल्याची प्रतिक्रिया अरुण जेटली यांनी दिली आहे.
तसंच आधार कार्डाबाबतची माहिती त्या व्यक्तीला विश्वासात घेऊनच दिली जाईल, आत्तापर्यंत 97 टक्के तरुणांनी तर 67 टक्के अल्पवयीन मुलांनी आधार कार्ड काढलं आहे, अशी माहिती अर्थमंत्र्यांनी दिली आहे. तसंच दररोज पाच ते सात लाख आधार कार्ड काढली जात असल्याचंही अरुण जेटली म्हणाले आहेत.