रेल्वेचे तिकीट बुकिंगसाठी आता आधारकार्ड जरुरीचे
रेल्वे तिकिटात पारदर्शकता आणण्यासाठी रेल्वेने आधारकार्ड नंबर जरुरी करण्याच्या विचारात आहे.
नवी दिल्ली : रेल्वे तिकीटमधील गौडबंगाल रोखण्यासाठी आणि रेल्वे तिकिटात पारदर्शकता आणण्यासाठी रेल्वेने आधारकार्ड नंबर जरुरी करण्याच्या विचारात आहे. त्यासाठी तयारी केली आहे. त्यामुळे तिकिटांचा काळाबाजार रोखला जाणार आहे.
दरम्यान, गतवर्षी सर्वोच्च न्यायालयाने आधारकार्ड सरकारी योजनांच्या लाभासाठी आवश्यक नसल्याचा निर्णय दिला होता. मात्र, रेल्वेतील तिकीट घोटाळा रोखण्यासाठी सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केलेय. त्यासाठी आधी ज्येष्ठ नागरीक, स्वातंत्रसैनिक, अपंग यांच्यासाठी आधारकार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने दिले. याबाबत वृत्त 'बिझनेस टुडे'ने प्रकाशित केलेय.
दुसऱ्या टप्प्यात रेल्वेच्या सर्वच सेवांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड महत्वाचे असणार आहे. रेल्वे तिकीट बुकिंग करताना आधारकार्ड बंधनकारक असणार आहे. तसेच रेल्वे तिकीटावर आधार नंबर प्रिंट होणार आहे. त्यामुळे आधारकार्ड नसेल तर तुम्हाला तिकीट मिळणार नाही.
तसेच तुमचे तिकीट आता मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. रेल्वेची सबसिडी कमी करण्यासाठी रेल्वे तिकिटावर तिकीटाची मूळ किंमत आणि रेल्वेला होणारा तोटा प्रिंट कऱण्यात येणार आहे. जेणेकरुन रेल्वे प्रवास करताना तुम्हाला मिळणारी सूट समजावी, असा या मागील उद्देश आहे.