नवी दिल्ली : काश्मीरमध्ये आत्तापर्यंत सेनेवर दगडफेक करणारे तरुण तुम्ही पाहिले असतील... परंतु, आता बुरखाधारी काश्मिरी मुलीही दगडफेक करण्यासाठी उतरल्याचं चित्र पाहायला मिळतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी आठवड्याभराच्या बंदीनंतर काश्मीर खोऱ्यातले शाळा आणि कॉलेज पुन्हा सुरू झाले. तेव्हा श्रीनगरच्या मौलाना आझाद रोडवर हे चित्र पाहायला मिळालं. 24 एप्रिल रोजी 'गव्हर्नमेंट कॉलेज फॉर वीमेन'जवळ वेगवेगळ्या भागांत मुली सुरक्षा रक्षकांशी भिडल्या... या घटनेत एक मुलगी जखमी झालीय. तिला श्रीनगरच्या महाराज हरि सिंह हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय.


'देशासाठी फुटबॉल खेळायचंय'


'टाईम्स ऑफ इंडिया'नं दिलेल्या वृत्तानुसार, दगडफेक करणाऱ्या या मुलींमध्ये काही फुटबॉल खेळाडूही आहेत. 21 वर्षीय फुटबॉल खेळाडूनं स्वत:च या गोष्टीचा खुलासा केलाय. 


'होय मी दगडफेक केली... परंतु, मला असं करायचं नव्हतं... मला देशासाठी फुटबॉल खेळायचंय' असं तिनं म्हटलंय. अफशां ही काश्मीरची पहिली महिला फुटबॉल कोच आहे. गव्हर्नमेंट विमेन कॉलेजमध्ये ती बी.एच्या दुसऱ्या वर्षाला शिकतेय.


'दगडफेक करत नव्हतो पण...'


त्यांच्या फुटबॉल टीममध्ये कोठी बागेतल्या गव्हर्नमेंट हायर सेकंडरी स्कूलच्या 20 मुली आहेत. सोमवारी प्रॅक्टीससाठी त्या मैदानावर पोहचणार होत्या तेव्हा काही मुलांना पोलिसांनी दगडफेक करताना पाहिलं. पुलवामा डिग्री कॉलेजमध्ये काही विद्यार्थी पोलिसांच्या कारवाईविरुद्ध आंदोलन करत होते. 


आंदोलन सुरू असताना मी वैतागून मुलींना काही वेळ वाट पाहण्यास सांगतिलं... पोलिसांना आम्हीही दगडफेक करण्यासाठी उभे आहोत असं वाटलं... एका पोलीस कर्मचाऱ्यानं येऊन एका मुलीच्या कानाखाली मारली... त्यामुळे आम्हाला राग अनावर झाला... मला त्या मुलीला पाठिंबा द्यायचा होता त्यामुळे आम्ही दगडफेक सुरू केली... असं या मुलीनं म्हटलंय.


पोलिसांचं म्हणणं वेगळंच...


दुसरीकडे पोलिसांच्या म्हणण्यानुसार, 'पोलीस मागे सरतेय... आणि आपल्याविरुद्ध काहीही कारवाई होणार नाही असं वाटल्यानं मुलींनी दगडफेक सुरू केली. पोलीस आणि सीआरपीएफनं नियंत्रण कायम ठेवलं... कोणत्याही विद्यार्थिनीला दुखापत झाली नाही, यातून हे दिसून येतंय'


'मुलींच्या रक्तानं स्वातंत्र्य'


पोलिसांनी ज्या मुलीला कानाखाली मारली त्या मुलीनं नाव जाहीर न करता आपलं म्हणणं मांडलंय. 'आर्मी, सीआरपीएफ आणि पोलिसांवर मी नाराज आहे. सीआरपीएफ एका महिलेला मारझोड करत असल्याचा व्हिडिओ मी पाहिला होता. मी त्यांच्यावर दगडफेक करायला तयार आहे. आत्तापर्यंत मुलांच्या रक्तानं स्वातंत्र्य मिळालं... कदाचित आता मुलींच्या रक्तानं मिळेल... असा विचार करून माझ्या काही सहकाऱ्यांनी दगडफेक केली' असं तिनं म्हटलंय.