नवी दिल्ली : उरी दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानविषयी घेतलेली कडक भूमिका कायम राखत इस्लामाबादमध्ये नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ‘सार्क’ परिषदेवरही बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इस्लामाबादमध्ये होणाऱ्या परिषदेस पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार नाहीत, असे परराष्ट्र मंत्रालयातर्फे स्पष्ट करण्यात आले. भारताच्या या भूमिकेनंतर बांग्लादेशानेही सार्क परिषदेला उपस्थित न राहण्याचा निर्णय जाहीर केला. अफगाणिस्तान आणि भूतान या देशांनीही सार्क परिषदेला अर्थ नसल्याचे म्हटले आहे.


उरीत लष्कराच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राजनैतिक पातळीवर पाकिस्तानची चहुबाजूंनी कोंडी करण्याचे धोरण आखले आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी कालच संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेच्या व्यासपीठावरून पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणांवर कडाडून हल्ला केला होता. 


रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, असे सांगत सिंधू पाणीवाटप करारातील तरतुदीही भारतीय प्रशासन आता तपासून पाहू लागले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानमध्ये होणाऱ्या ‘सार्क’च्या परिषदेबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत होते.