चेन्नई : तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि एआयएडीएमकेच्या दिवंगत नेत्या जयललिता यांच्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण, याची जोरदार चर्चा असताना आता व्ही. के. शशिकला यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्यांच्याकडे पक्षाची धुरा सोपवा, अशी मागणी होत आहे. याला वरिष्ठ नेत्यांची मूक संमती असल्याचे पुढे आलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जयललिता यांच्या खास विश्वासू सहकारी शशिकला यांच्याकडे सूत्रे सोपवण्यासाठी  आग्रह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी धरला आहे. पक्षानेच ही माहिती आज शनिवारी दिली. दरम्यान, जयललिता यांच्या निधनानंतर लवकरच पक्षातील उच्चपद असलेल्या महासचिवपदासाठी नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.


जयललिता यांच्या निधनानंतर अण्णाद्रमुकचे पुढे काय, पक्षांतर्गत वाद वाढतील का, जयललिता यांच्या विश्वासू शशिकला यांच्याकडे पक्षाची सूत्रे जाणार का, आदी अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत.  दरम्यान, शशिकला यांच्याकडे पक्षाची धुरा सोपवण्यात काहीच गैर नाही. त्या पक्षातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत, असे पक्षातील सूत्रांनी सांगितले.
 
तर दुसरीकडे शशिकला यांची राज्याचे मंत्री भेट घेत असल्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या चर्चेबाबत उत्तर देताना प्रवक्ता सी. पोन्नाईयान यांनी शशिकला यांच्या नावाला अप्रत्यक्ष पाठिंबाच दिला. पक्षातील कोणी शशिकला यांची भेट घेत असल्यास त्यात गैर काय आहे. त्या पक्षाच्या प्रमुख नेत्या नाहीत का? असा प्रतिप्रश्न उपस्थित केला.