नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून NDA बैठकीचे निमंत्रण दिले आहे. गुरुवारी शाह यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

10 एप्रिलला दिल्लीत ही बैठक होत आहे. विविध राष्ट्रीय मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. तसेच राष्ट्रपतीपदाचा NDA चा उमेदवार ठरवण्याबाबतही चर्चा अपेक्षित आहे. 


शिवसेना भाजपमध्ये निर्माण झालेला तणाव दूर करण्यासाठी भाजपच्या केंद्रीय आणि राज्य पातळीवरील नेत्यांकडून प्रयत्न सुरु आहेत. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातले भाजपचे दोन ज्येष्ठ मंत्री 'मातोश्री'वर सदिच्छा भेटीसाठी जाणार होते. 


मात्र NDA बैठकीच्या निमित्तानं जर पक्षश्रेष्ठी स्तरावरच शिवसेनेशी संबंध मधुर करण्यासठी प्रयत्न होण्याचे संकेत मिळाल्याने मंत्र्यानी त्यावेळी 'मातोश्री' पुढे ढकलली. मात्र सध्या शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडिया अधिका-याला केलेल्या मारहाणीचं प्रकरण खूप गाजतेय. 


एअर इंडिया आणि अन्य विमान कंपन्यांनी गायकवाड यांच्यावर विमान प्रवासबंदी घातलीय. त्याचे पडसाद संसदेत उमटत आहेत. जोपर्यंत गायकवाड यांच्यावरचे निर्बंध हटवले जात नाहीत तोपर्यंत शिवसेना NDAच्या बैठकीत सहभागी होणार नाही असा पावित्रा शिवसेनेनं घेतलाय. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या NDA बैठकीतील सहभागाबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.