अमित शहांचा राहुल गांधींवर पलटवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी जवानांच्या बलिदानाची दलाली करत असल्याची टीका करणाऱ्या काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींवर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी जोरदार पलटवार केला.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी जवानांच्या बलिदानाची दलाली करत असल्याची टीका करणाऱ्या काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींवर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी जोरदार पलटवार केला.
सर्जिकल स्ट्राईकला राजकीय रंग देण्याचा कोणताही प्रयत्न भाजप करत नसल्याचे शहा यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. यावेळी त्यांनी राहुल गांधींच्या त्या वक्तव्यांचा खरपूस समाचार घेतला.
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी खून की दलाली असे म्हणत सर्व सीमांचे उल्लंघन केलेय. जवानांसोबत देशातील जनतेचा हा अपमान होय. मी त्यांना विचारु इच्छितो की कोळशापासून ते टूजीपर्यंत कोणी दलाली केली. काँग्रेसच्या धमन्यांमध्येच दलाली आहे.
दहशतवादाविरोधात जेव्हा संपूर्ण देश एकवटला जात आहे. त्यावेळी तुमचे हे विधान देशाच्या जवानांचे मानसिक खच्चीकरणासाठी कारणीभूत ठरु शकते. काँग्रेसने मोदींसाठी यापूर्वी मौत का सौदागर असे म्हटले होते त्यानंतर ते गुजरातमध्ये हरले. त्यांनी त्यांनी विषाची शेती हा शब्द वापरला. तेव्हा भाजप बहुमताने जिंकली आता काय होईल कोणी सांगू शकत नाही. राहुल गांधीची शेतक-यांबद्दलची समज बटाट्याच्या फॅकट्री पर्यंत मर्यादीत आहे, अशी टीका त्यांनी गांधींवर केली.
काही राजकीय पक्षांनी सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित केले. मात्र असे प्रश्न उपस्थित करणाऱ्यांचा मी निषेध करतो. सर्जिकल हल्ल्यावर प्रश्न उपस्थित करणे हा लष्कराचा अपमान होय, असे शहा म्हणाले.
शहा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंज केजरीवाल यांच्यावरही जोरदार टीकास्त्र सोडले. केजरीवाल यांनी सर्जिकल स्ट्राईक केल्याचे पुरावे मागितले होते. मी येथे सांगू इच्छितो की केजरीवाल गुरुवारी पाकिस्तानात ट्रेंड होत होते. यावरुन कळते की केजरीवाल कोणाला फायदा देतायत, अशा शब्दात त्यांनी केजरीवालांवर निशाणा साधला.