इडन गार्डनची खेळपट्टी खोदून टाकू
टी 20 वर्ल्ड कपमधली भारत आणि पाकिस्तानमधल्या मॅचसमोरची संकटं कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत.
कोलकाता: टी 20 वर्ल्ड कपमधली भारत आणि पाकिस्तानमधल्या मॅचसमोरची संकटं कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. धर्मशालामध्ये होणारी ही मॅच सुरक्षेच्या कारणानिमित्त रद्द करण्यात आली, त्यानंतर आता कोलकात्याच्या इडन गार्डनमध्ये ही मॅच खेळवण्यात येणार आहे.
पण इडन गार्डनची खेळपट्टी उखडून टाकण्याची धमकी एँटी टेररिस्ट फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच एटीएफआय या संघटनेनं दिली आहे. तसंच ही मॅच होऊन देऊ नका असं पत्रही त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना लिहीलं आहे. ही मॅच घेणं म्हणजे शहीद जवानांचा अपमान असल्याचं या पत्रामध्ये लिहिण्यात आलं आहे.
मुंबई आणि पठाणकोटवरचा दहशतवादी हल्ला, तसंच पांपोर हल्ल्यातल्या दोषींना पाकिस्तान भारताकडे सुपूर्त करत नाही तोपर्यंत भारत-पाकिस्तान मॅच होऊ नयेत अशी मागणी या संघटनेनं केली आहे.
या मॅचला विरोध म्हणून एटीएफआय ही संघटना इडन गार्डन, टीमचं हॉटेल आणि कोलकाता विमानतळावर आंदोलन करणार आहे. धर्मशालाची मॅच कोलकात्यामध्ये होणार असल्यामुळे ममता बॅनर्जींनी क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचा अध्यक्ष सौरव गांगुलीला पत्र लिहीलं, आणि 19 मार्चला होणाऱ्या या मॅचला पूर्ण सुरक्षा पुरवू असं आश्वासन दिलं आहे.