नवी दिल्ली: असहिष्णूतेचा वाद गेल्या काही दिवसांपासून देशभरामध्ये सुरु आहे. या वादावरून केंद्रातल्या मोदी सरकारवर जोरदार टीका झाली. पण प्रत्येकवेळी अभिनेते अनुपम खेर यांनी केंद्र सरकारची बाजू घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता अनुपम खेर यांनी याच मुद्द्यावरून काँग्रेसला टोला हाणलाय. आपल्या देशामध्ये काँग्रेसचे लोकच खरे सहिष्णू आहेत, कारण ते ज्या माणसाला सहन करतात त्याला पंतप्रधान बनवायला निघाले आहेत. ते अशा माणसाला सहन करु शकतात, तर जगातली कोणतीही गोष्ट सहन करु शकतात, अशी बोचरी टीका अनुपम खेर यांनी केली आहे. 


गेल्या 2 वर्षांपासून भ्रष्टाचाराचा एकही मुद्दा आला नाही, त्यामुळे काँग्रेसकडे मुद्दा नसल्यानं अहिष्णुतेचा वाद पसरवला गेल्याचं खेर म्हणाले आहेत. एक चहावाला देशाचा पंतप्रधान झालेलं काँग्रेसला पचल नसल्याची टीका अनुपम खेर यांनी केली आहे. 


राहुल गांधी ज्या दिवशी मोदींच्या एक दशांश कर्तृत्व दाखवतील त्या दिवशी मी त्यांना मत देईन असं अनुपम खेर यांनी भर कार्यक्रमामध्ये जाहीर केलं. तसंच वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या साध्वी प्राची आणि योगी आदित्यनाथ यांना भाजपनं पक्षातून काढून टाकून त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 


टेलिग्राफ या वृत्तपत्रानं असहिष्णुता या विषयावर चर्चा सत्र आयोजित केलं होतं. त्या चर्चासत्रामध्ये अनुपम खेर सहभागी झाले होते. या चर्चासत्रामध्ये सहभागी झालेल्या माजी न्यायमूर्ती गांगुली यांच्यावरही अफजल गुरुच्या मुद्द्यावरून अनुपम खेर यांनी टीका केली.