नवी दिल्ली : प्राप्तिकर विभागाच्या चौकशीत, स्वयंघोषित धर्मगुरु आसाराम बापू याच्याकडे तब्बल २३०० कोटी रुपयांची अघोषित मालमत्ता असल्याचं समोर आले आहे. त्यामुळे त्याच्या धर्मादाय संस्थांना दिल्या जाणाऱ्या करसवलती मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. देशातील धर्मादाय संस्थांना प्राप्तिकर नियम 80 जीनुसार सवलत दिली जाते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, प्राप्तिकर विभागाने आसाराम आणि त्याच्या अनुयायांकडे असलेली अघोषित संपत्ती उघड केली आहे. त्यापैकी बहुतांश गुंतवणूक आसारामने अधिग्रहण केलेल्या कोलकातामधील सात कंपन्यांमार्फत झाली आहे. त्याचे भक्त या कंपन्या चालवतात.


प्राप्तिकर विभागाच्या चौकशीविषयी बोलताना आश्रम प्रवक्त्या नीलम दुबे म्हणाल्या, हा बापूजींविरोधात कट आहे. त्यांच्याकडे कोणतीही संपत्ती नाही. त्यांच्याकडे स्वतःची मोटारदेखील नाही. प्रत्येक गोष्ट ट्रस्टच्या आणि त्यांच्या अनुयायांच्या नावावर आहे. अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी आसाराम सध्या तुरुंगात आहेत.


स्थावर मालमत्ता, म्युच्युअल फंड्स, किसान विकास पत्र आणि फिक्स डिपॉझिट योजनांमध्ये गुंतवणूक करुन आसाराम आणि अनुयायांनी हजारो कोटी रुपयांची मालमत्ता जमवली आहे.