हुंडा म्हणून नववधू आणते देशी बियर
छत्तीसगडच्या बस्तर भागामध्ये नवविवाहित मुलगी हुंडा म्हणून चक्क देशी बियर घेऊन येते.
बस्तर : छत्तीसगडच्या बस्तर भागामध्ये नवविवाहित मुलगी हुंडा म्हणून चक्क देशी बियर घेऊन येते. ही बियर बाजारामध्ये मिळणारी बिअर नसून झाडाच्या रसापासून बनणारी देशी बियर असते.
बस्तरमध्ये सल्फी नावाचं एक झाड प्रसिद्ध आहे. या झाडापासून एक रस निघतो, हा रस शरीरासाठी लाभदायक मानला जातो. या झाडापासून निघणारा हा रस काही काळानंतर शिळा होतो आणि हा रस पायल्यामुळे नशाही चढते. यामुळे या पेयाला बस्तरची देशी बियर म्हणूनही ओळखलं जातं.
सल्फी झाडाची उंची 40 फुटांपर्यंत असते. नऊ ते दहा वर्षानंतर हे झाड रस द्यायला सुरुवात करतं. पण सध्या सल्फीची झाडं ऑक्सिफोरम फिजिरियम नावाच्या फंगसमुळे सुकत आहेत. बस्तरमध्ये सल्फी झाडाचं वेगळंच महत्त्व आहे. बस्तर भागातल्या आदिवासींचं सल्फी झाडाचं पेय हे महत्त्वाचं उत्पन्नाचं साधन आहे. त्यामुळे इथले रहिवासी आपल्या मुलींना लग्नाच्या वेळी सल्फीचं झाड हुंडा म्हणून देतात.