मणिपूर : मणिपूर विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला जनतेनं स्पष्ट कौल दिला नसल्यानं सत्ता स्थापनेसंदर्भात मोठा पेच निर्माण झाला आहे.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मणिपूरमध्ये २८ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस आला आहे पण त्यांना बहुमतासाठी आणखी दोन आमदारांची गरज आहे. पण असे असून भाजपा सत्ता स्थापण्याची शक्यता आहे. २१ जागा मिळवणा-या भाजपानं मणिपूरमध्ये ११ आमदारांची जुळवाजुळव करत सरकार स्थापनेचा दावा केला आहे. प्रादेशिक पक्षांसह एका अपक्षाच्या पाठिंब्याचं पत्रच भाजपानं राज्यपालांना सुपूर्द केलं आहे. 


२०१२ मध्ये ० आमदार असणाऱ्या भाजपने घवघवीत यश मिळवत २१ आमदारांपर्यंत मजल मारली आहे.  


चार जागा जिंकणा-या नागा पीपल्स फ्रंट आणि नॅशनल पीपल्स पार्टीनं भाजपाला पाठिंबा दिला आहे. त्याचसोबत लोकजनशक्ती पक्ष, तृणमूल काँग्रेस आणि एक अपक्षही भाजपा सरकारमध्ये सामील होण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे मणिपूर विधानसभेतील भाजपाचं संख्याबळ 32च्या वर गेलं असून, भाजपानं लागलीच राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांच्याकडे 32 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र देऊन सरकार स्थापनेचा दावा केला आहे.


21 जागा पटकावणाऱ्या भाजपानंतर नॅशनलिस्ट पीपल्स पार्टी (एनपीपी), नागा पीपल्स फ्रंट (एनपीएफ) ईशान्य लोकशाही आघाडीने प्रत्येकी चार काबीज केल्या. रालोआचा घटक पक्ष असलेला एलजीपी, तृणमूल काँग्रेस आणि अपक्षांनी प्रत्येकी एक जागा जिंकली आहे. एनपीपी-4, लोजपा-1 हे स्वतंत्ररीत्या लढले असले तरी रालोआत घटक पक्ष आहेत. आम्ही तृणमूल काँग्रेस आणि अपक्ष आमदारासोबत चर्चा करू, असे भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार एन. बीरेन यांनी सांगितले आहे.