बंगळुरु : देशातली दुसऱ्या क्रमांकाची आय.टी. फर्म, इन्फोसिसमधल्या वादावर अध्यक्ष आर. शेषसाई आणि CEO विशाल सिक्का यांनी आज प्रथमच मौन सोडलं. आपल्याला समभागधारकांनी निवडून दिलंय आणि आपलं कार्य अद्याप संपलेलं नाही, असं सांगत शेषसाई यांनी एका अर्थी संस्थापकांच्या आपेक्षांना सुरुंग लावलाय.


CEO सिक्का आणि मॅनेजमेंटमधल्या काही जणांच्या पॅकेजवरून संस्थापक नारायण मूर्ती, नंदन निलेकणी आणि क्रिस गोपालकृष्णन यांनी सध्याच्या संचालक मंडळावर आठवड्याभरापूर्वी तोफ डागली होती. त्यानंतर मूर्ती यांनी मॅनेजमेंटवर अविश्वास दाखवला नसल्याचं वृत्त आलं असलं तरी स्वतः मूर्ती यांनीच व्यवस्थापनाबाबत आपण उपस्थित केलेल्या शंका कायम असल्याचं म्हटलं. शेषसाई आणि सिक्का यांनी मात्र पॅकेजचं जोरदार समर्थन केलं. आपल्याला इन्फोसिस व्यावसायिकरित्या चालवायची असल्याचं शेषसाई म्हणाले. मात्र त्याच वेळी आपण संस्थापकांच्या कायम संपर्कात असतो आणि त्यांचा वारंवार सल्ला घेतो, हे सांगायलाही दोघं विसरले नाहीत.