नवी दिल्ली : बिहारमधल्या नीलगायींना मारण्यावरुन दोन केंद्रीय मंत्र्यांमध्ये जुंपली आहे. पर्यावरण खात्याचा हा निर्णय लाजिरवाणा असल्याची टीका महिला व बालविकास मंत्री मनेका गांधींनी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिहारमध्ये नील गायींनी धुडगूस घातलाय. त्यांना मारण्यासाठी हैदराबादहून शार्प शूटर्स  बोलावण्यात आलेत. दोन दिवस हे शार्प शूटर्स नीलगायींना गोळ्या मारत फिरत आहेत. या शार्प शूटर्सनी आतापर्यंत अडीचशेहून जास्त नीलगायी मारल्या आहेत. 


नीलगायींना मारण्यासाठी बिहार सरकारने केंद्रीय पर्यावरण खात्याकडे प्रस्ताव पाठवला होता. त्याला पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकरांनी परवानगी दिली. त्यामुळे मनेका गांधींनी जावडेकरांवर टीका केली आहे. 


चंद्रपुरमध्येही अशा प्रकारे ५३ रानडुकरांना मारण्यात आलं होतं.  आता आणखी ५० रानडुकरांना मारण्याचे आदेश पर्यावरण खात्याने दिले आहेत. तिथल्या वनअधिका-यांची रानडुकरांना मारण्याची इच्छा नाही, तरीही त्यांना तसे आदेश दिल्याचा, मनेका गांधींचा आरोप आहे. 


पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकरांनी मात्र मनेका गांधींना थेट उत्तर द्यायचं टाळलंय. बिहार सरकारनंच नीलगायींना मारण्याचा प्रस्ताव पाठवल्याचं त्यांचं म्हणणं आहे. 


गेले काही दिवस नीलगायींनी दिल्लीकरांची चांगलीच गोची केली आहे.  विजय चौकात घुसलेल्या नील गायीला पकडता, पकडताही पुरती दमछाक झाली होती. आता बिहारमधल्या नील गायींना मारण्यावरुन दिल्लीत पुन्हा गोंधळ झाला आहे.