नवी दिल्ली : मनोहर पर्रिकरांच्या शपथविधीविरोधात काँग्रेसनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. त्यासंदर्भात सुप्रीम कोर्टात उद्याच सुनावणी होणार आहे. गोव्याच्या राज्यपाल मृदूला सिन्हा यांनी भाजपला सरकार स्थापन करण्याचं निमंत्रण दिल्याच्या निर्णयाला काँग्रेसनं सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोव्यामध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरलाय त्यामुळे राज्यपालांनी काँग्रेस पक्षाला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित करायला हवं होतं असं काँग्रेसचं म्हणणं आहे. त्यामुळेच ही याचिका दाखल केली गेल्याचं काँग्रेसनं म्हटलंय.


सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश जगदीश खेहर यांनी विशेष खंडपीठाच्या माध्यमातून याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास मान्यता दिलीय. गोवा आणि मणिपूरमध्ये भाजप सत्ता स्थापनेचा कुठलाच अधिकार नसल्याचं काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. तर गोव्यामध्ये मनी पॉवर जिंकल्याची टीका दिग्विजय सिंहांनी केली होती.


काँग्रेस उद्या गोवा आणि मणिपूरमधील भाजपचा सत्ता स्थापनेचा मुद्दा संसदेतही उपस्थित करणार आहे. मनोहर पर्रिकरांचा उद्या संध्याकाळी 5 वाजता शपथविधी समारोह आहे. पर्रिकरांनी त्यासाठी आपल्या संरक्षणमंत्रिपदाचा राजीनामाही दिलाय.