लखनऊ : गोमांस प्रकरणाला ९ महिने उलटल्यानंतर उत्तर प्रदेशात दादरीमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोमांस भक्षण केल्याबद्दल हत्या करण्यात आलेल्या अखलाकच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत जोरदार निदर्शनं करण्यात आली. विशेष म्हणजे गौतम बुद्ध नगरचे जिल्हाधिकारी एन.पी. सिंग यांनी दिलेला जमावबंदीचा आदेश झुगारून आंदोलक रस्त्यावर उतरले. 


अखलाकच्या घरात फ्रिजमध्ये सापडलेलं मांस गोवंशाचंच असल्याचं फॉरेन्सिक प्रयोगशाळेच्या अहवालात समोर आलंय. त्यानंतर आता अखलाकच्या कुटंबावर गुन्हा नोंदवण्याच्या मागणीनं जोर धरलाय. या मागणीसाठी ग्रामस्थांनी काल महापंचायत बोलावल्याची चर्चा होती. 


बिशाडा गावात ही महापंचायत होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची अतिरिक्त कुमक रवाना करण्यात आली. हे प्रकरण कोर्टात असल्यानं नागरिकांनी आपलं म्हणणं तिथंच मांडावं. हिंसाचार करून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय. तर पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप या प्रकरणातल्या आरोपींच्या नातलगांनी केलाय.