नवी दिल्ली : एकतर्फी प्रेमातून गेली दहा वर्षे नवी दिल्ली ते अमेरिकेतील टेक्सास पर्यंत एका महिलेचा पाठलाग करणाऱ्या ३२ वर्षीय व्यक्तीला अमेरिकेत १९ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीये. जितेंद्र सिंग असं या व्यक्तीचं नाव आहे. तसंच त्याला ४ हजार अमेरिकन डॉलरचा दंडही ठोठावण्यात आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिंतेंद्र पहिल्यांदा त्या महिलेशी दिल्लीच्या एका कॉलेजमध्ये भेटला होता. २००६मध्ये जितेंद्रने तिला लग्नासाठी विचारले मात्र तिने नकार दिला. तिच्या नकारामुळे जितेंद्र नाराज झाला. यानंतर त्याने तिचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. तिला मारण्याची धमकी दिली. 


त्या पिडीत महिलेचे डिग्रीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत जितेंद्र तिचा पाठलाग करत होता. त्यानंतर २००७मध्ये पिडीत महिला न्यूयॉर्कमध्ये शिकण्यास गेली. मात्र तेथेही जितेंद्रने तिचा पाठलाग सुरुच ठेवला. तिने ज्या युनिर्व्हिसिटीत अॅडमिशन घेतले तिथे जितेंद्रने अॅडमिशन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला अॅडमिशन मिळाले नाही. जेव्हा पिडीत महिला इंटर्नशिपसाठी कॅलिफोर्नियामध्ये राहत असल्याचे जितेंद्रला कळले तेव्हा त्याने तिच्या घराचा पत्ता शोधला आणि पुन्हा तिला त्रास देण्यास सुरुवात केली. ती जिथे जिथे जात असे तिथे जितेंद्र तिचा पाठलाग करत असे.


२०११ ते २०१४दरम्यान जितेंद्र पिडीत महिलेला फोन कॉल तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या सहाय्याने तिला त्रास देत होता. अखेर २०१४मध्ये जितेंद्रविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.