सुरत : सुरतचे हिरे व्यापारी सावजीभाई ढोलकिया हे त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून 400 फ्लॅट आणि 1260 गाड्या देणार आहेत. सावजीभाई ढोलकियांच्या कंपनीची वार्षिक उलाढाल सहा हजार कोटीएवढी आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सावजीभाई ढोलकिया यांची हरे कृष्णा एक्सपोर्टर्स या कंपनीमध्ये सध्या साडेपाच हजार कर्मचारी काम करतात. यातल्या ज्या कर्मचाऱ्यांनी सर्वोत्तम कामगिरी केली अशा 1665 कर्मचाऱ्यांना हा बोनस दिला जाणार आहे. या कर्मचाऱ्यांपैकी 1200 कर्मचाऱ्यांचा पगार दहा हजार ते साठ हजारांच्यामध्ये आहे.  


या कंपनीमधल्या 400 कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून घरही देण्यात येणार आहे. या घरासाठी काढण्यात आलेल्या कर्जाची संपूर्ण रक्कम कंपनीच देणार आहे. पुढच्या पाच वर्षांसाठी मासिक पाच हजार रुपयांचेा इएमआय कंपनी देणार आहे. तर 56 कर्मचाऱ्यांना ज्वेलरी बॉक्स देण्यात येणार आहेत.


याच कंपनीनं मागच्या वर्षी 1716 कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून 491 गाड्या, 200 फ्लॅट आणि 1,716 ज्वेलरी बॉक्स दिले होते. मागच्या वर्षी ज्या कर्मचाऱ्यांना हा बोनस मिळाला त्यांना यंदाच्या बोनसमध्ये सहभागी करण्यात आलेलं नाही.


अमरेली जिल्ह्यातल्या दुधला गावातून सावजीभाई 1977मध्ये एसटीनं सुरतला आले होते. सुरतला येताना त्यांच्याकडे फक्त तिकीटासाठीचे 12.50 रुपये होते.