मुंबई : गुरुवारी लागलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल लागला. यात, आसाममध्ये काँग्रेसला तोंडावर पडावं लागल्याचं समोर आलं. आता या पराभवाला जबाबदार कोण? याबद्दलच्या चर्चांना ऊत आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसला केवळ केरळ आणि आसाममध्ये आपला गडही राखता आला नाही. शिवाय, तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये ज्या पक्षांनी काँग्रेसशी हातमिळवणी त्यांनाही पराभव चाखावा लागलाय. यामुळेच, पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी कुजबुजती का होईना पण चांगलीच टीका केलीय. 


कार्यकर्त्यांची टीका


लोकसभा निवडणुकीनंतर आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देऊ केला. पण, सोनियांनी मात्र त्यांचा राजीनामा नाकारला. तेव्हाच पक्षाची सूत्रं  हिमांता सारणा यांच्यासारख्या तरुण नेतृत्वाकडे द्यायला हवी होती, असं एका ज्येष्ठ कार्यकर्त्यांनं म्हटलंय. 


तरुण कार्यकर्त्यांना संधी नाही


हिमांता सारणा यांना काँग्रेसमध्ये संधी मिळाली नाही म्हणून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळचा किस्साही या कार्यकर्त्यांनं कथन केलाय. याच हिमांता यांनी आता केवळ आपली जागा राखली नाही तर तब्बल ९०,००० जास्त मतं मिळवलीत. 


कुत्र्यानं पळवली बिस्किटं


सारणा यांनी पक्ष सोडला तेव्हाचा किस्सा सांगताना त्यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वावर टीका केलीय. राहुल यांच्याशी संवाद साधायला गेलो असताना म्हणणं मांडण्यासाठी आपल्याला दोन मिनिटांचा अवधी दिला गेला. या मिटिंगसाठी गोगोई आणि पक्षाचे सेक्रेटरी सीपी जोशीही उपस्थित होते. 


जेव्हा सारणा आपलं म्हणणं मांडत होते तेव्हा एक छोटा कुत्रा आला आणि त्यानं पाहुण्यांसाठी ठेवलेल्या बशीतली बिस्कीटं उचलली... कुत्र्याला पाहून राहुल यांनीही त्याच्याशी खेळायला सुरुवात केली. हे पाहिल्यानंतर सारणा यांना राग अनावर झाला. काँग्रेसमध्ये राहणं त्यांना अशक्य वाटू लागलं. 


राहुल गांधींचा मॅसेज


यानंतर सारणा यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा ते अमित शहा यांच्या घरी होते तेव्हा राहुल गांधींनी सारणा यांना भेटीसाठी एक एसएमएस पाठवला. त्याला 'आता खूप उशीर झालाय' असा रिप्लाय सारणा यांनी पाठवला.


पक्षाकडून अशाच पद्धतीनं दिल्या जाणाऱ्या वागणुकीमुळे कार्यकर्ते पक्षापासून दूरावत चालल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.