चंदीगढ : भारताचे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग पुन्हा एकदा शिक्षकाच्या भूमिकेत जाणार आहेत. ज्या विद्यापीठातून त्यांनी पदवी मिळवली आणि पुढे काही काळ प्राध्यापक म्हणून काम केले त्याच पंजाब विद्यापीठात ते पुन्हा एकदा शिक्षक म्हणून जाणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जवाहरलाल नेहरु चेअरअंतर्गत पंजाब विद्यापीठाने डॉ. सिंग यांना काही व्याख्यानं देण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्यांनी ते निमंत्रण स्वीकारल्याची आता माहिती आहे.


खरं तर डॉ. सिंग यांच्या कामाचा व्याप आणि त्यांचं वय पाहता हे कसं शक्य होईल, असा प्रश्न होता. पण, ते जेव्हा चंदीगढमध्ये असतील तेव्हा प्रत्यक्ष विद्यापीठात जाऊन व्याख्यानं देतील. इतर वेळेस व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांच्या व्याख्यानांचं आयोजन करण्यात येईल.


डॉ. मनमोहन सिंग यांनी १९५२ साली पंजाब विद्यापीठातून बी.ए. चा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. तर १९५४ साली त्यांनी तिथूनच एम.ए. केलं. दोन्ही वेळेस ते संपूर्ण विद्यापीठात प्रथम आले होते. १९५७ साली त्यांनी वरिष्ठ शिक्षक म्हणून विद्यापीठात नोकरी करण्यास सुरुवात केली. १९६३ साली ते प्राध्यापक झाले. १९६६ साली संयुक्त राष्ट्रसंघात गेल्याने त्यांनी विद्यापीठ सोडले.


१० वर्ष भारताचे पंतप्रधान राहिल्यावर आज पुन्हा ते आपल्या लाडक्या कामात व्यस्त होणार आहेत, हा त्यांचा मोठेपणा म्हणायला हवा. पंजाब विद्यापीठातील विद्यार्थी जगाने ज्यांच्या ज्ञानाचं कौतुक केलं आहे अशा डॉ. मनमोहन सिंग सरांच्या वर्गात उपस्थित राहायला उत्सुक असतील यात शंका नाही.