नवी दिल्ली :  जानेवारी महिन्यातच रेल्वेने काही नवीन कोच आणले आणि त्यांची भरपूर चर्चाही झाली. दिल्ली - कानपूर 'महामाना एक्सप्रेस'साठी या कोचचा वापरही सुरू झाला. पण, आता भारतीय रेल्वे जास्तीत जास्त आधुनिक होण्याच्या प्रयत्नात आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून आता रेल्वेच्या डब्यांना स्वयंचलित दरवाजे लावण्यात येणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वेने ५ किलोमीटर प्रति तास इतका वेग पकडला की हे दरवाजे आपोआप बंद होतील. त्याचप्रमाणे दोन डबे जोडणाऱ्या इंटर कार गँगमध्येही काही आमूलाग्र बदल करण्यात येणार आहेत.


हे नवे डबे कपूरथळा फॅक्टरीत तयार करण्यात येत आहेत. सध्या एकूण २० कोचवर काम सुरू आहे. ज्यातील १४ एसी सीट, ३ एक्जिक्युटिव्ह चेअर कार आणि ३ पॉवर कार यांचा समावेश आहे. यातील काही डबे तयार झाले आहेत.


या डब्यांची रंगसंगती चित्त्यासारखी असेल अशी माहिती आहे. त्याचे आणि बाकी काही सजावटीचे काम अहमदाबादमधील 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझायनिंग' येथे सुरू आहे. या नवीन डब्यांमध्ये वॅक्क्यूम टॉयलेट फ्लशिंग सिस्टिम, अटेंडन्ट कॉल बेल, जीपीएस, विमानासारखी पँट्री आणि एलईडी लाइट्सही असतील. हे नवीन डबे साधारणतः मे - जून महिन्यात रुळांवर येण्याची शक्यता आहे.