नवी दिल्ली : गुरुवारी संपू्र्ण देश होळीच्या उत्साहात न्हाऊन निघाला. यात देशातील राजकारणीही मागे नव्हते. पण, यात विशेष लक्ष मिळवेधले ते काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी. गेल्या काही दशकात पहिल्यांदाच त्यांनी होळी साजरी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस पक्षाचे मुख्यालय असणाऱ्या २४, अकबर मार्ग या ठिकाणी सोनिया आणि राहुल गांधी पक्ष कार्यकर्त्यांसोबत जवळपास १५ मिनीटे होळी खेळले. तेथे उपस्थित असलेल्या महिला कार्यकर्त्यांनी सोनिया गांधी यांना फुलांचा गुच्छ दिला तर राहुल गांधींना गुलाल लावला. यावेळी पक्षातील अनेक वरिष्ठ कार्यकर्तेही उपस्थित होते.



 
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आपण सर्व धर्मियांचा पक्ष आहोत, अशी स्वतःची प्रतिमा तयार करणे काँग्रेसला गरजेचे वाटू लागल्याचे बोलले जात आहे. यात विशेषतः भारतीय जनता पक्षाने काँग्रेस म्हणजे केवळ 'अल्पसंख्यांकांचा पक्ष' अशी प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केला ती पुसून टाकणे काँग्रेसला गरजेचे वाटत आहे.


'मी सर्वांना होळीच्या शुभेच्छा देतो. रंगांचा हा सण आपल्या देशात असलेले वैविध्य आणि तरीही त्यात असणारी एकता यांचे प्रतीक आहे,' असे राहुल गांधी म्हणाले. 'पंतप्रधानांनाही तुम्ही या शुभेच्छा देता का?' असा प्रश्न त्यांना केला असता, 'नक्कीच. माझ्या शुभेच्छा सर्वांसाठी आहेत,' असे राहुल गांधी म्हणाले.


दरम्यान, २०१७ साली होणाऱ्या उत्तर प्रदेश विधान सभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे प्रचार संयोजक प्रशांत किशोर यांनी राहुल गांधींना राज्यातील हिंदू ब्राह्मण या त्यांच्या पारंपरिक मतदारालाही विश्वासात घेण्याचा सल्ला दिला आहे, अशा बातम्या आल्या होत्या. काँग्रेसची होळी म्हणजे याच रणनीतीचा तर भाग नाही ना, असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय.