मुंबई : देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात स्वदेशीचा जागर करणारी खादी आणि सध्याच्या काळात स्टाईल स्टेटमेंट खादी आणि त्यावर आधारित लाखो कारागिरांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत आहे. कारण, आता दर शुक्रवारी केंद्र सरकारी कार्यालयात खादीचे कपडे परिधान करण्याची विनंती आता केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशभरात लाखो व्यक्ती खादी उद्योगावर आधारित आहेत. त्यामुळे त्यांच्या परिस्थितीत सुधारणा व्हावी आणि हातमागावर तयार केलेल्या खादी कपड्याला 'अच्छे दिन' यावे यासाठी केंद्र सरकारच्या खादी व ग्राम उद्योग आयोगाकडून केंद्र सरकारला याविषयीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. 'केंद्र सरकारशी याबाबत चर्चा सुरू असून लवकरच सरकारकडून तसं आवाहन केलं जाईल,' असं आयोगाचे अध्यक्ष व्ही. के. सक्सेना यांनी सांगितलं.


खादीचे कपडे घालण्यासाठी शुक्रवार हा दिवस निवडला जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारचे देशभरात ३० ते ४० लाखांच्या घरात कर्मचारी आहेत. यातील प्रत्येकाने किमान खादीच्या एका वस्त्राची निर्मिती केली तरी खादीचा उद्योग मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो, असा सरकारचा यामागील विचार आहे. एक दिवस खादी वापरण्यासाठी बहुतेक सरकारी कर्मचाऱ्यांची हरकत नसल्याचं एका संशोधनात आढळून आल्याचा दावाही या आयोगाने केला आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः खादीच्या कपड्यांचा वापर करतात. त्यांचे 'स्टाईल स्टेटमेंट' असलेले मोदी जॅकेटही त्यांच्या प्रचाराच्या काळात प्रसिद्ध झाले होते. आता सरकारने याविषयीचा निर्णय घेतल्यास कर्मचारी त्याला कसा पाठिंबा देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.